Maratha Reservation: राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आरक्षणास टाळाटाळ- अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 02:38 AM2018-07-28T02:38:55+5:302018-07-28T05:51:45+5:30
अटकसत्र थांबवण्याची मागणी
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्र्यांनी मागासवर्ग आयोगाची भेट घेण्याचा प्रकार निव्वळ नाटकबाजी आहे. भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध असल्यामुळेच सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या मंत्र्यांनी मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. त्यावर चव्हाण म्हणाले की, काँग्रेस आघाडीचे सरकार असताना मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले. पुढे सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने या आरक्षणाचे संरक्षण केले नाही. उच्च न्यायालयातही त्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
एक प्रतिज्ञापत्र सादर करायला सरकारला १७ महिने लागले, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. मागासवर्ग आयोगाचे कारण आता पुढे केले जात आहे. आयोगाकडे आरक्षणाचा प्रश्न अगोदरच का सोपवला नाही, असा सवाल करतानाच मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाल्यावर आयोगाकडे जाण्याचे नाटक सरकारकडून केले जात आहे.
कोम्बिंग आॅपरेशन थांबवावे
मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हिंसक होणार नाही, याची काळजी घ्यावी. हिंसाचारात सहभाग नसलेल्या अनेक आंदोलक युवक व महिलांवर सूडबुद्धीने गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. सरकारने निर्दोष तरुणांवर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत व त्यांच्या अटकेसाठी सुरू केलेले कोम्बिंग आॅपरेशन थांबवावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.