मान्सूनपूर्व कामांना निवडणूक आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा; आचारसंहितेमुळे कामे मंजूर करून घेण्यावर पालिकेचा भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:23 AM2024-04-04T11:23:11+5:302024-04-04T11:25:57+5:30

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे विशेष करून मान्सूनपूर्व कामांसाठी पालिकेला निवडणूक आयोगाकडे जोर लावावा लागणार आहे.

awaiting election commission approval for pre monsoon works emphasis of municipality on approval of works due to code of conduct in mumbai | मान्सूनपूर्व कामांना निवडणूक आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा; आचारसंहितेमुळे कामे मंजूर करून घेण्यावर पालिकेचा भर

मान्सूनपूर्व कामांना निवडणूक आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा; आचारसंहितेमुळे कामे मंजूर करून घेण्यावर पालिकेचा भर

मुंबई : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे विशेष करून मान्सूनपूर्व कामांसाठी पालिकेला निवडणूक आयोगाकडे जोर लावावा लागणार आहे. पाण्याचा निचरा, पाणीउपसा करण्यासाठी पंपाची खरेदी, गाळ वाहतुकीसाठी वाहनांचा पुरवठा, पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई आदी कामांसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार लागणार आहे. इतकेच नव्हे, तर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीही आयोगाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे विविध कामांचे प्रस्ताव आयोगाकडे पाठविण्यात आले असून पालिकेला आता आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

आचारसंहिता कधी लागू होणार, याचा अंदाज असल्याने पालिकेने यापूर्वीच विविध कामांचे प्रस्ताव मार्गी लावले आहेत. मात्र, पावसाळा पूर्व आणि पावसाळ्यात कराव्या लागणाऱ्या कामांसाठी पालिकेची तयारी सुरू होती. काही कामे आणि त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सध्या धोरणात्मक कामे करता येणार नाहीत. त्यामुळे प्रामुख्याने भर हा पावसाळ्यातील कामांवर देण्यात आला आहे. रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांच्या निविदा यापूर्वीच काढण्यात आल्या आहेत. 

१) गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाचे काम मार्गी लावण्यात तिढा निर्माण झाला आहे. 

२) दोन पुलांच्या उंचीतील तफावत दूर करण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांनी काही उपाय सुचविले आहेत. मात्र, यासाठीही आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

३)  रस्त्यांच्या कामांबाबत काही अडचण नाही. मात्र, ही कामेही पावसाळ्यानंतर करावी लागणार आहेत. साहजिकच पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमेल तेवढे काँक्रीटीकरण पूर्ण केले जाईल. 

४)  आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रत्येक कामासाठी आयोगाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठीही मंजुरी आवश्यकता आहे, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आपत्कालीन कामांसाठीचे प्रस्ताव पालिकेकडून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीकडे पाठविले जातात. त्यानंतर, यापैकी किती कामे तातडीची आहेत, याचा आढावा घेऊन तेवढेच प्रस्ताव आयोगाकडे पाठविले जातात. 

सध्या आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले प्रस्ताव हे सुमारे २२८ कोटी रुपयांचे आहेत. महत्त्वाचे प्रकल्प थांबू नयेत, यासाठी विविध विभागांकडून कामांचा आढावा घेतला जात आहे. पावसाळा पूर्व आणि पावसाळ्यात कराव्या लागणाऱ्या कामाचे सुमारे ११८ कोटी रुपयांचे प्रस्ताव आहेत. 

Web Title: awaiting election commission approval for pre monsoon works emphasis of municipality on approval of works due to code of conduct in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.