डॉ. राजेश डेरे यांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा; नशेत होते की नाही याचे गूढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:33 AM2024-05-30T10:33:15+5:302024-05-30T10:33:38+5:30
डॉ. राजेश डेरे यांची मंगळवारी नायर रुग्णालयात तडकाफडकी बदली
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सायन रुग्णालय येथील अपघात प्रकरणातील डॉ. राजेश डेरे यांचा वैद्यकीय अहवाल प्रलंबित असून, घटनेच्या दिवशी ते नशेत होते की नाही? याचे गूढ कायम आहे. या अपघातात जुबेदा शेख (५८) या महिलेचा मृत्यू झाला होता. जुबेदा या मधुमेहग्रस्त होत्या. त्यांच्या हाताला जखम होऊन ती चिघळल्याने दोन आठवड्यांपूर्वी त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर १६ मे रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. जखम झालेल्या हाताला मलमपट्टी करण्यासाठी चार दिवसांपासून जुबेदा शीव रुग्णालयात येत होत्या.
जुबेदा शुक्रवारी मलमपट्टी करण्यासाठी सायन रुग्णालयात होत्या. मलमपट्टी करून सायंकाळी ७:३० वाजता त्या घरी जाण्यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ७ मधून बाहेर पडत असताना मोटरगाडीने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा नोंदवत डॉ. डेरे यांना अटक केली. घटनेच्या दिवशी डेरे नशेत होते की नाही? याचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्रलंबित आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मृत्यूला कारणीभूत ठरल्याबरोबरच दिशाभूल केल्याप्रकरणाच्या कलमाचाही समावेश करण्यात आला आहे. याप्रकरणी सायन पोलिस अधिक तपास करीत आहेत.
अखेर नायर रुग्णालयात बदली!
सायन रुग्णालय परिसरातील महिलेचा अपघाती मृत्यूप्रकरणी जामीन मिळालेल्या सायन रुग्णालयाच्या न्यायवैदक विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांची मंगळवारी नायर रुग्णालयात तडकाफडकी बदली करण्यात आली. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांना सायन रुग्णालयात प्रवेश देऊ नये, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे शवविच्छेदन जे. जे. रुग्णालयात करण्यात आले असून, अहवालानुसार तिच्या बरगाड्यांना अंतर्गत गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे, या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाला उशिरा दिल्यामुळे आणखी संशय बळावला आहे.