मुंबई : भायखळा येथील हँकॉक पुलाशेजारी असणारी थोवर मेंशन ही म्हाडाची इमारत मागील अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. ही इमारत पुनर्विकासासाठी एका खासगी विकासकाने आपल्या ताब्यात घेतली आहे; परंतु आज कित्येक वर्षे उलटली तरीही रहिवासी या इमारतीच्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेतच आहेत. पालिकेतर्फे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा नोटीस येऊन गेली आहे.
मात्र, विकासक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. इमारत दुरुस्त न केल्यामुळे अनेकदा इमारतीत स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. विकासकाने रहिवाशांकडून इमारत पुनर्विकासासाठी सर्व कागदपत्रे आपल्या ताब्यात घेऊनही रहिवाशांना इमारत पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत ठेवले आहे.
हँकॉक पुलाच्या रुंदीकरणासाठी शिवदास छापसी मार्गावरील काही इमारती बाधित होणार आहेत. त्यामध्ये या इमारतीचादेखील समावेश आहे. त्यामुळे इमारतीतील नागरिकांचे इतर ठिकाणी स्थलांतर होईल का या चिंतेत नागरिक आहेत. महानगरपालिका ही इमारत रिकामी करण्याची तर वाट विकासक पाहत नाही ना, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित होत आहे. या इमारतीची तातडीने दुरुस्ती व्हावी, त्याचप्रमाणे इमारतीचा लवकरात लवकर पुनर्विकास करण्यात यावा, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.