पाण्यासाठी जागरण, हाणामारीही! कळशी, हंडे घेऊन महिलांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 02:42 PM2023-06-14T14:42:20+5:302023-06-14T14:42:45+5:30

कैलारी व्हिलेजला हाेताेय अपुरा पाणीपुरवठा

Awakening for water, clashes too! Women's pipe with kalshi, hande | पाण्यासाठी जागरण, हाणामारीही! कळशी, हंडे घेऊन महिलांची पायपीट

पाण्यासाठी जागरण, हाणामारीही! कळशी, हंडे घेऊन महिलांची पायपीट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेने मोठा गाजावाजा करत सर्वांसाठी पाणी हे धोरण लागू केले असले तरी आजही शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेशा पाण्यापासून वंचित राहावे लागत असून, हक्काच्या पाण्यासाठी भांडावे लागत आहे. केवळ दीड ते दोन तास कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणी भरण्यासाठी जागरणे होत असतानाच वरच्या माळ्यावर राहणाऱ्या रहिवाशांना पाणी पोहोचत नसल्याने सोसायट्यांमधील वाद चव्हाट्यावर येत प्रसंगी हाणामारीच्या घटनाही घडत आहेत.

मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी पाण्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाला या गोष्टींची जाणीव करून दिली असली तरीही महापालिकेचे अधिकारी याबाबत वेळकाढू धोरण राबवत असल्याने आजही मुंबईकर हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत.

कमी दाबाने पाणीपुरवठा- जोगेश्वरी पूर्वेकडील गौतमनगर, कीर्तीनगर आणि गणेशनगर या तीन वस्त्यांची लोकसंख्या सुमारे दहा हजारांच्या आसपास आहे. या वस्तीला सकाळी केवळ दोन ते दीड तास पाणी मिळते. मात्र, या काळात येणाऱ्या पाण्याचा दाब कमी असतो. पाण्याचा दाब वाढविण्यात यावा, यासाठी जल कार्यकर्ते सुनील यादव यांनी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत अनेकदा बैठकाही घेतल्या. 

कार्यालयांत खेटे- गोवंडी, मानखुर्द, धारावी, कुर्ला, मालवणी आणि मालाडसह कित्येक झोपड्यांत पाण्याची विदारक अवस्था आहे. मालाड, मालवणी आणि गणपत पाटील नगरसारख्या झोपड्यांत राहत असलेल्या नागरिकांना जलजोडणीसाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत.

पाणी विकत घ्यावे लागते- मालाड अंबुजवाडी येथेही कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाणी येण्याची वेळ कमी असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते.

वरच्या माळ्यावर पाणी येत नाही म्हणून कोणी घरही घेत नाही- कुर्ला पश्चिमेकडील बहुतांश वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होत असला तरी त्याला दाब कमी असल्याने केवळ तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना पाणी मिळते. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावरील रहिवाशांना पाण्याची मोटार सुरू केल्याशिवाय पाणी मिळत नाही. मोटार लावली नाही तर घरातली पाण्याची टाकी निम्मीही भरत नाही. मध्यरात्री पाण्याचा दाब मोठा असल्याने रात्रीची १२:३० ते १:३० ही वेळ पाणी भरण्यासाठी काढावी लागते, अशी माहिती कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजारातील वाडिया इस्टेट कॉलनीमधील रहिवाशांनी दिली. तिसऱ्या माळ्यावर पाणी येत नसल्याने अनेक रहिवासी तिसऱ्या माळ्यावर घर विकत घेत नाहीत किंवा भाड्यानेही राहत नसल्याचे चित्र आहे.

भूगर्भातील पाण्याचा केला जातो वापर- कुर्ला पश्चिमेकडील काही वस्त्या अशा आहेत जिथे सांडपाण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा वापर केला जातो. मोठी वस्ती या पाण्यावर अवलंबून नसली तरीही पिण्याचे पाणी वाया जाऊ नये म्हणून नागरिकांनी हे पाणी वापरतात.

आरेचा प्रश्न वेगळा- आरे कॉलनीतील युनिट क्रमांक पाच येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.  पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आवाज उठविला आहे. मात्र, पालिका पाणी प्रश्नावर गंभीर नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

गरज किती- वाढती लोकसंख्या पाहता मुंबईला किमान ५ हजार दशलक्ष लीटर पाणी पुरवठ्याची गरज आहे. त्यामुळे आणखी किमान १ हजार दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे.

टॅंकरसाठी भांडाभांड- मलबार हिल तीनबत्ती डोंगरश्री येथील इमारतीसह चाळ रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पालिकेकडून मर्यादित पाणी टँकर दिले जातात. ते अपुरे पडतात व  अधिक पैसे माेजून पाणी विकत घेण्याची वेळ येते, तेव्हाही भांडाभांड हाेते. डोंगरश्री येथे मोठ्या प्रमाणात कुटुंबासह रहिवासी राहतात. लोकसंख्यासुद्धा जास्त आहे.  संध्याकाळी येथे पाणी येते. मात्र, बऱ्याच वेळा पाणी मिळत नाही. कधी कधी पाणी तोंडातही घेण्यासारखे नसते. ज्यांना शक्य आहे ते लोक खासगी टँकर मागवतात.

एक टँकर ५ हजार- जेव्हा परिसरात पाणी मिळत नाही. तेव्हा पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी टँकर मागवावे लागतात. ३ ते ५ हजार रुपये एका टँकरला माेजावे लागतात.

धरणांनी गाठला तळ; पाऊस लांबल्यास टंचाई जाणवणार- मुंबई शहराला सध्या तानसा, मोडक सागर (वैतरणा), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. ही धरणे मुंबईपासून १०० किमीपेक्षा जास्त अंतरावर असून केवळ विहार आणि तुळशी हे दोनच तलाव मुंबईत आहेत. मुंबईला या सात तलावांतून ३,८५० दशलक्ष लीटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणांनी आता तळ गाठायला सुरुवात केली असून पालिकेची भिस्त आता राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणातील राखीव पाणीसाठ्यावर आहे.

आम्हाला कोणी पाणी देता का पाणी? महापालिकेची जोडणी घेऊनही नळ राहतात कोरडे- पावसाळा सुरू होण्यास अद्याप काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे कमी दाबाने पाणी येत असून, चेंबूरमधील भारतनगर झोपडपट्टीतील शाळकरी मुले, गृहिणी यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. भारतनगर येथे भीमटेकडी परिसरात दुपारी ११ ते २ पर्यंत पाणी येते. पाण्याचा दाब कमी असल्याने भीमटेकडीसारख्या उंच भागात पाणी मिळत नाही. त्यामुळे रहिवाशांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. आपल्याला हक्काचे पाणी मिळावे, वणवण करावी लागू नये म्हणून रहिवाशांनी पालिकेची जोडणी घेतली आहे. जोडणी घेऊनही पाणी येत नाही. मात्र, एक हजार ते दोन हजारांचे बिल नागरिकांच्या माथी मारले जात आहे. शाळेला सुटी असल्याने मुले घरी होती. त्यामुळे पालकांना चिंता नव्हती. मात्र, येत्या काही दिवसांत मुले शाळेत गेली की पाण्याची वेळ चुकेल आणि मग आणखी लांब जाऊन पाणी आणावे लागणार आहे, तर भारतनगरमधील काही भागात पाणी येते.

नळावर इतकी गर्दी असते की दोन तास बसावे लागते. जेथे पाणीच येत नाही, त्यांना दुसऱ्या नळावर ३०० रुपये द्यावे लागतात. - सुमन घोडेराव, रहिवासी

आम्ही पालिकेच्या नळाची जोडणी घेतली आहे. मात्र, पाणी येतच नाही. आम्ही इतर नळावर पाणी भरतो. मात्र, तरीही नळजोडणीचे बिल १००० ते २००० रुपये येते. - पूनम गुप्ता, रहिवासी

 

Web Title: Awakening for water, clashes too! Women's pipe with kalshi, hande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.