पनवेल : शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि नागरिकांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. याबाबत जनजागृतीसाठी सिडकोने मिटकॉन या संस्थेच्या माध्यमातून शालेयस्तरावर जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. सिडको वसाहतीतील विविध शाळांमध्ये पर्यावरणविषयक कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती करण्यात आली आहे.वाढत्या लोकवस्तीमुळे दररोज तीनशे टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. हा कचरा उलचून सिडको क्षेपणभूमीवर टाकते. त्याची शास्त्रशुद्धपद्धतीने विल्हेवाटही लावली जाते. असे असले तरी गृहनिर्माण संस्था, सदनिकाधारक, दुकानदार, फेरीवाले कचरा टाकतातच.गटारे, नालेसुद्धा लोक सोडत नाहीत, त्यामध्येही टाकाऊ वस्तू फेकून दिल्या जात आहेत. परिस्थिती जैसे थे असून जिकडे तिकडे प्लास्टिकचा खच पडलेला दिसून येत आहे. या सर्व गोष्टींवर प्रभावी काम करण्याकरिता तसेच थेट रहिवाशांपर्यंत जाण्याच्या उद्देशाने सिडकोने मिटकॉन या एजन्सीची नियुक्ती केली. गेल्या काही महिन्यांत त्यांनी खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथे अनुक्र मे डीएव्ही, रायन, सी.के.टी, बांठिया, फडके आणि ज्ञानदीप शाळेत कार्यशाळा घेतल्या.अशा प्रकारची कार्यशाळा नुकतीच नवीन पनवेल येथील फडके विद्यालयात पार पडली. यावेळी नवीन पनवेलचे अधीक्षक, अभियंता तथा प्रशासक प्रदीप तांबडे, कार्यकारी अभियंता मिलिंद भानगावकर, डॉ. आनंद सोनावणे, नितीन बागुल, मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांच्यासह सिडको आणि मिटकॉनचे अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन
By admin | Published: March 01, 2015 10:39 PM