Join us

शिक्षण विभागासह यंत्रणेला जाग

By admin | Published: June 25, 2015 3:15 AM

रेझोनन्स, सिनॅप्स आणि सिन्हाल क्लासचा भांडाफोड केलेल्या ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशननंतर शिक्षण विभागासह संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झालीे.

मुंबई : रेझोनन्स, सिनॅप्स आणि सिन्हाल क्लासचा भांडाफोड केलेल्या ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशननंतर शिक्षण विभागासह संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झालीे. विद्यार्थी संघटनांसह प्राध्यापक संघांनीही याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी करत विद्यार्थी-पालकांनी अशा आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये तीनही क्लासनी १०० टक्के हजेरी माफ करून प्रॅक्टिकलमध्ये कॉलेजकडून १०० टक्के गुण मिळवून देण्याचा दावा केला होता. मात्र पितळ उघडे पडताच आमिष दाखवणाऱ्या क्लासेसने बुधवारी कोलांटउडी घेतली. स्टिंगबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तिन्ही क्लासेसच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, असा कोणताही दावा आमचा क्लास करत नसल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या. याप्रकरणी संबंधित कॉलेज प्रशासनाकडून मात्र उलट प्रतिक्रिया मिळाल्या. निर्मला कॉलेजच्या प्राचार्यांनी इंटिग्रेटेड प्रवेश प्रक्रियेवर बंदी घालण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कॉलेजमध्ये प्राध्यापकांची नेमणूक केलेली आहे. त्यासाठी क्लासची गरज नाही. शिवाय किमान ७५ टक्के हजेरी शासनाने बंधनकारक केलेली आहे. ज्यातून कोणत्याही विद्यार्थ्याला सूट मिळू शकत नाही. याउलट सिनॅप्स क्लासेससोबत सेटिंग असल्याचे मान्य केलेल्या समता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास प्राचार्यांनी प्रतिनिधीला टाळणेच पसंत केले. त्यामुळे क्लास आणि कॉलेजमध्ये सुरू असलेल्या सेटिंगबाबत प्राचार्यांची भूमिका संशयास्पद दिसून येते.