काेराेना काळात स्वखर्चाने भुकेलेल्यांना जेवण देण्याच्या महायज्ञाची वर्षपूर्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना, लॉकडाऊन काळात रस्ते, पदपथ, झोपडपट्टीत राहणारे, हातावर पोट असलेल्यांचे दोन वेळच्या जेवणाचे प्रचंड हाल झाले. गेल्यावर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी गरीब, गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला; मात्र लॉकडाऊन शिथिल हाेताच अनेकांनी मदत थांबवली. पण रस्ते, पदपथावरील नागरिकांसाठी मे २०२०मध्ये जेवण पुरवण्याचा सुरू केलेला महायज्ञ मुंबईतील ॲड. वैभव थोरात यांनी अद्याप कायम ठेवला आहे. त्यांच्या गरिबांची भूक भागवण्यासाठीच्या महायज्ञाची १ मे रोजी वर्षपूर्ती होत आहे. या ३६५ दिवसांमध्ये त्यांनी तब्बल ३६ हजारांपेक्षा अधिक लोकांची भूक भागवली आहे.
लॉकडाऊन काळात बेघर, गरिबांचे अन्नावाचून हाल होत असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होत होत्या. त्यातच रस्त्यावरील मुलांना भुकेने व्याकूळ होताना पाहिल्यानंतर या मुलांसाठी काहीतरी करावे, असे विचार वैभव यांच्या मनात येऊ लागले. त्यातूनच रस्त्यावर राहणाऱ्यांना किमान एकवेळचे जेवण देण्याचा निर्णय त्याने घेतला. व्यवसायाने उद्योजक असल्याने भायखळा येथे त्यांनी एक किचन सुरू केले. पालिकेची परवानगी घेऊन मे महिन्यात किचन सुरू झाले. त्यानंतर दररोज रात्री १०० लोकांना ताजे आणि पौष्टिक जेवण पुरविण्यास त्यांनी सुरुवात केली. रात्री ८च्या सुमारास गाडीमध्ये जेवणाच्या प्लेट भरून मुंबईच्या रस्त्यावर ते निघतात आणि भायखळापासून कधी दक्षिण मुंबईच्या दिशेने, कधी पूर्व उपनगर तर पश्चिम उपनगराच्या दिशेने त्याचा हा प्रवास सुरू होतो.
रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक गरीब, पदपथावर झोपणाऱ्या व्यक्तीला ते जेवणाचे ताट देतात. यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांची संख्या अधिक असते असे ते सांगतात. टाटा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटलच्या आवारात रुग्णांसाठी बसलेल्या आणि भुकेल्या नातेवाईकांनाही ते जेवण देतात.
अनेकदा काही कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे किंवा जेवण वाटप करायला जाण्यात अडचणी आल्या, मात्र अशावेळीही ते रात्री-अपरात्री उशिराने जेवण वाटायला जातात. मात्र, सर्वांना वेळेत जेवण मिळावे यासाठी वैभव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. या कामात त्यांना चैतन्य बनसोडे, ललित पटेल, समीर चव्हाण, विराज बनसोड, हंसराज जैस्वाल, विजय मिश्रा, प्रतीक बेनके, अजय जगताप, संजय शिंदे यांनी मोठ्या उत्साहाने मदत केल्याचे वैभव सांगतात. वैभव कामात असताना त्यांचे हे सहकारी गाडी घेऊन गरीब, झोपडपट्टीतील नागरिकांना जेवण वाटप करण्याचे काम करतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आल्याने त्यांनी आपला हा यज्ञ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
* पोलिसांनाही पुरवले जेवण
लॉकडाऊन काळात गरिबांना जेवण देत असताना अनेकदा ड्यूटीवर असलेल्या पोलिसांना वेळेवर जेवण मिळत नसल्याचे दिसून येई, त्यावेळी त्यांनाही जेवण देत असल्याचे उद्योजक ॲड. वैभव थोरात यांनी सांगितले.
* लोकांमध्ये बसून केले जेवण
झोपडपट्टी भागात जेवण वाटप करताना जेवणाचा दर्जा कसा असेल किंवा जेवण खराब झाले असेल, असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. अशावेळी अनेकदा नागरिकांसोबत बसून स्वतः जेवण केल्याचे वैभव यांनी सांगितले.
--------------