Join us

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच पुरस्कार

By admin | Published: December 24, 2015 2:06 AM

समाजातील सर्व घटकांचा सन्मान होत असताना समाजातील अतिशय महत्त्वाचा आणि कायम दुर्लक्षित असलेला घटक म्हणजे पोलीस दल होय

मुंबई : समाजातील सर्व घटकांचा सन्मान होत असताना समाजातील अतिशय महत्त्वाचा आणि कायम दुर्लक्षित असलेला घटक म्हणजे पोलीस दल होय, अशा शब्दांत राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी पोलीस दलाची व्यथा मांडली. बुधवारी सायंकाळी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात पार पडलेल्या ‘पोलीस जीवनगौरव पुरस्कार’ सोहळ््यात इनामदार बोलत होते.ते म्हणाले की पोलिसांना ओळखतात तर सगळेच, मात्र दखल कोणीच घेत नाही. पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांचे जीवन हे सर्कसप्रमाणे असून पहिला तास ट्रेनिंग, दुसरा तास कर्तव्यपूर्ती आणि तिसरा तास निवृत्तीचा असतो. या खेळातच त्याचे संपूर्ण आयुष्य देशसेवा करण्यात निघून जाते.अरविंद इनामदार फाउंडेशनने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ््यात टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी पोलीस महांसचालक सूर्यकांत शंकर जोग, साहाय्यक पोलीस आयुक्त सॅम पटेल आणि मालेगावचे माजी जमादार दिलीप भागवत पाटील या तीन अधिकाऱ्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण देशात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात येणारी ही पहिलीच संस्था आहे. सोहळ््याला मुंबई पोलीस आयुक्त जावेद अहमद, उद्योगपती कायरस दादाचंजी आणि पोलीस दलातील आजी व माजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. केवळ पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे आज मुंबई व महाराष्ट्र सुरक्षित असल्याचे मत ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी व्यक्त केले. पोलिसांना कर्तव्यपूर्तीसाठी सर्वतोपरी मुभा देण्याची मागणी करीत प्रत्येक नागरिकाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आदर केलाच पाहिजे, असे आवाहनही टाटा यांनी केले.