Join us

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत सावकार-काणेंच्या नावे पुरस्कार; १६ बोलींतील २४९ एकांकिका सादर 

By संजय घावरे | Published: December 26, 2023 7:53 PM

मागील ६ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई - बोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे सांघिक पुरस्कार रंगभूमीला उत्तमोत्तम नाटके दिलेले नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार आणि दर्जेदार नाटकांची निर्मिती केलेले ज्येष्ठ नाट्यनिर्माते अनंत काणे यांच्या नावाने दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील महत्वाच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या सुप्रिया प्रॉडक्शनच्या या स्पर्धेत मराठी रंगभूमीवरील दिग्गजांच्या नावे वैयक्तिक पुरस्कारही देण्यात येतात. श्री शिवाजी स्मारक मंडळ आणि व्हिजन यांच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी ५ ते ७ जानेवारी आणि अंतिम फेरी १२ जानेवारी रोजी नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या जन्मदिनी शिवाजी मंदिरमध्ये होणार आहे.

मागील ६ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील सुमारे १६ बोलींतील २४९ एकांकिका आजवर या स्पर्धेत सादर झाल्या आहेत. ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेली हि स्पर्धा नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांच्या पुढाकाराने सर्वदूर पोहोचली आहे. मालवणी, सातारी, कोल्हापूरी, संगमेश्वरी, आगरी, खानदेशी, अहिराणी अशा विविध बोलींमधील एकांकिका या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. वेगवेगळ्या बोलींतील सहभागी एकांकिका, नामवंत परीक्षक, आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि अजित भगत, चेतन दातार, रघुवीर तळाशीलकर, विनय आपटे, सतीश तारे, आशालता वाबगांवकर, कुलदीप पवार, संगीतकार राजू पोतदार, रंगमहर्षी कृष्णा बोरकर, प्रकाश योजनाकार उमेश मुळीक अशा दिग्गज रंगकर्मींच्या नावाने ज्येष्ठ रंगकर्मींनीच पुरस्कृत केलेली रोख रकमांची वैयक्तिक पारितोषिके ही या स्पर्धेची वैशिष्ट्ये राहीलेली आहेत.

नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या नावाने दिला जाणारा सांघिक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केला आहे. ५ ते ७ जानेवारी या कालावधीत कुर्ला-नेहरुनगर येथील प्रबोधन प्रयोग घरामध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज सुप्रिया प्रोडक्शन डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

टॅग्स :मुंबई