मुंबई : दर्जेदार आणि अत्याधुनिक प्रवासी सेवांच्या गटात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (मुंबई) अव्वलस्थान कायम राखले आहे. प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देत मुंबई विमानतळाने आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेच्या ‘उत्कृष्ट विमानतळ’ या पुरस्कारावर सलग चौथ्यांदा आपली मोहोर उमटवली.
मुंबई विमानतळावरून दरवर्षी जवळपास ४० दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक प्रवाशाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा देण्यास कटिबद्ध असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोना काळ हवाई वाहतूक क्षेत्रासाठी कसोटीचा ठरला; परंतु या काळातही प्रवाशांच्या गरजा समजून घेऊन त्यांना सेवा देण्यावर भर देण्यात आला. स्पर्शविरहित प्रवास, सेल्फ चेक-इन अशा प्रकारच्या सुविधांना प्रवाशांनीही प्रतिसाद दिल्याने सुरक्षित प्रवासाच्या कसोटीवर मुंबई विमानतळ खरे उतरले. या सर्वांचा परिपाक म्हणून हा पुरस्कार मिळाल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.