लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘काळोखाच्या पारंब्या’ या चित्रपटाने मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली मोहोर उमटवली. या चित्रपट महोत्सवामध्ये बेस्ट सिनेमोटोग्राफी गटात सुरेश देशमाने यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा हा महोत्सव ऑनलाइन घेण्यात आला.
‘काळोखाच्या पारंब्या’ हा चित्रपट प्रख्यात कथा लेखक भारत सासणे यांच्या ‘डफ’ या कथेवर आधारित आहे. मकरंद अनासपुरे, सुरेश देशमाने आणि मनोज पिल्लेवान (स्वामीगंगा प्रॉडक्शन) हे चित्रपटाचे निर्माते आहेत. त्याची पटकथा आणि संवाद श्रीकांत सराफ आणि हेमंत पाटील यांनी लिहिले आहेत.
यानिमित्ताने मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हरीश इथापे हे मुख्य सहायक दिग्दर्शक आहेत. संगीत मिलिंद जोशी यांचे आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी एक वेगळी भूमिकाही साकारली आहे. नवख्या कलावंतांना घेऊन या कलात्मक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मराठी भाषेतील अभिजात साहित्यावर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे यावेळी अनासपुरे यांनी सांगितले.