कला, कलाप्रकारांना गौरविण्यासाठी पुरस्कार पुनर्गठन समिती - विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 01:54 AM2019-09-02T01:54:53+5:302019-09-02T01:54:56+5:30
तावडे म्हणाले की, राज्य सांस्कृतिक संचालनालयाने गेल्या पाच वर्षांत ७५ पुरस्कार दिले.
मुंबई : भावी कलाकारांमध्ये कलेची अधिक गोडी निर्माण होऊन प्रतिभावंत कलाकार निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने पुरस्कार पुनर्गठन समिती नेमणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळा आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित करत, मान्यवरांचा सत्कार सोहळा शुक्रवारी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे उपसचिव विलास खाडे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या प्रभारी संचालिका मीनल जोगळेकर, पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक विभीषण चावरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तावडे म्हणाले की, राज्य सांस्कृतिक संचालनालयाने गेल्या पाच वर्षांत ७५ पुरस्कार दिले. कलाकारांना दिलेल्या पुरस्कारांविषयी सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्यावर आपण तेच १२ पुरस्कार परंपरागत देत आहोत, असे निष्कर्षात आले. राज्यात विविध क्षेत्रांतील विविध कला आणि कला प्रकार आहेत. नवनवीन कलांना वाव देऊन प्रतिभावंत कलाकार घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने पुरस्कार पुनर्गठन समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोणते पुरस्कार वाढवावे, याचा विचार करेल. या समितीत मान्यवर कलाकारांचा समावेश असेल, पुरस्कारासाठी योग्य उमेदवार याबाबत प्रारूप माहिती किंवा सूचना शासनाच्या संकेतस्थळावर देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध लोककला, संस्कृती, चित्रपट, नाटक, पारंपरिक वाद्यसंगीतास प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. यापुढेही शासनाची भूमिका ही कलावंताच्या मागे भक्कमपणे उभे राहणे अशीच आहे.
१२ ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान
सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया १२ ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाटक विभागासाठी सतीश पुळेकर, कंठ संगीतासाठी कमल भोंडे, उपशास्त्रीय संगीतासाठी मंगलाताई जोशी, मराठी चित्रपटासाठी मनोहर आचरेकर, कीर्तनासाठी तारा राजाराम देशपांडे ,शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरे, नृत्यासाठी रत्नम जनार्धनम्, आदिवासी गिरीजनसाठी नीलकंठ शिवराम उईके, वाद्यसंगीतासाठी अप्पा वढावकर, तमाशासाठी हसन शहाबुद्दीन शेख, लोककलेसाठी लताबाई सुरवसे आणि कलादानसाठी सदाशिव देवराम कांबळे यांना पुरस्कार देण्यात आला. १ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांचाही गौरव
या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार विजेते अकादमी रत्न उस्ताद झाकीर हुसेन, सुगम संगीतासाठी सुरेश वाडकर, नाट्यलेखनासाठी राजीव नाईक, अभिनयासाठी सुहास जोशी यांचाही सत्कार राज्य शासनाच्या वतीने करण्यात आला. ‘संस्कृती रंग’ या कार्यक्रमातून राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या मानकऱ्यांचे त्यांच्या शिष्यांकडून आणि मराठी कलासृष्टीतील कलाकारांकडून यावेळी कलेच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात आली.