राज्य स्तरावरील चित्रकला स्पर्धेत महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनीला पुरस्कार
By सचिन लुंगसे | Published: November 22, 2022 02:37 PM2022-11-22T14:37:02+5:302022-11-22T14:38:14+5:30
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील ऊर्जा दक्षता ब्युरोद्वारे ऊर्जा व पर्यावरण विषयाच्या अनुषंगाने राज्य स्तरिय चित्रकला स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. राज्यभरातून १ हजार ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
मुंबई - केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील ऊर्जा दक्षता ब्युरोद्वारे ऊर्जा व पर्यावरण विषयाच्या अनुषंगाने राज्य स्तरिय चित्रकला स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. राज्यभरातून १ हजार ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यक्षेत्रातील कुलाबा महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळेतील ७ व्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी रिया बप्पी साहिस हिला रुपये ७,५००/- इतक्या रकमेचे विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. चर्चगेट परिसरातील पाटकर सभागृहात नुकत्याच आयोजित झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान केंद्र सरकारच्या संबंधित खात्याचे ज्येष्ठ अधिकारी सुब्रता मंडल यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन कुमारी रिया साहिस हिच्या कलेचा गौरव करण्यात आला आहे. याप्रसंगी जी. जी. वाघमारे, कला क्षेत्रातील ज्येष्ठ प्राध्यापक नितीन केणी, पूनम परुळेकर, मिरा सावंत यांच्यासह राज्यभरातून आलेले पुरस्कार विजेते विद्यार्थी व संबंधित शिक्षक उपस्थित होते.
महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी राजू तडवी, कुलाबा महानगरपालिका उच्च प्राथमिक इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक आरिफ शेख, विभाग निरिक्षिका सुजाता हुलवान आणि शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदांनी रिया साहिस हिचे तिच्या यशाबद्दल अभिनंदन करित तिच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. पारितोषिक प्राप्त चित्राबद्दल तिच्या कला शिक्षिका मिरा बोडके यांनी कळविले आहे की, रिया हिने १८ X २४ इंच आकाराच्या ‘हाफ इम्पिरियल’ प्रकारच्या कागदावर ‘ऑईल पेस्टल’ प्रकारचे रंग वापरुन सदर अर्थवाही चित्र काढले होते. स्पर्धेच्या मान्यवर परीक्षकांनी या चित्राची निवड पुरस्कारासाठी केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १ हजार १०० पेक्षा अधिक असणा-या शाळांपैकी ए विभागातील ‘कुलाबा उच्च प्राथमिक इंग्रजी शाळा’ ही एक शाळा आहे. या शाळेत पहिली ते आठवी चे वर्ग असून यामध्ये १ हजार ५६३ विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. तर या शाळेत ४० इतक्या संख्येने शिक्षक वर्ग असून शिक्षकेतर कर्मचा-यांची संख्या ५ इतकी आहे. या शाळेमध्ये नियमित शिक्षणासोबतच कलागुण विकास केंद्र, संगणक वर्ग, व्हर्च्युअल क्लासरुम, संगीत वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा वर्ग आदी सोई-सुविधा आहेत, अशीही माहिती सदर शाळेद्वारे कळविण्यात आली आहे.