मुंबई - मागील १९ वर्षांपासून अज्ञात समाजसेवकांना प्रकाशझोतात आणून त्यांना पुरस्काराने सन्मानित करणाऱ्या 'गगन सदन तेजोमय' दिवाळी पहाट कार्यक्रमात 'ध्यास सन्मान' पुरस्कार प्रदान करण्यात आले. सातत्याने वेगळे कार्य करणाऱ्या 'नाट्यपराग' आणि 'पराग प्रतिष्ठान' तसेच 'विवेकानंद व्याख्यानमाला' राबविणाऱ्या 'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ' यांचा ध्यास सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील सावरकर स्मारक सभागृहामध्ये 'गगन सदन तेजोमय' दिवाळी पहाट रंगला. 'अॅड फिझ'च्या परंपरेनुसार सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांत गेली ४६ वर्षे माणसांची आणि मनांची चळवळ उभारणाऱ्या 'नाट्यपराग' आणि 'पराग प्रतिष्ठान'ला ध्यास सन्मान प्रदान करण्यात आला. याखेरीज चिंचपोकळीतील कामगार वस्तीत 'विवेकानंद व्याख्यानमाला'सारखे उपक्रम रावबून, विविध क्षेत्रांतील नामवंतांचे विचार आणि प्रबोधन नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा वसा घेतलेल्या 'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ'लाही ध्यास सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आले. भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, सुजय पत्की, डॉ. नीना सावंत, अॅड. संजीव सावंत, एलआयसीच्या शिल्पा सापळे, कला दिग्दर्शक गोपी कुकडे, साईनिर्णयचे महेश खर्द, विनायक गवांदे, डॉ. माधुरी गवांदे आदी मंडळी उपस्थित होती. विविध प्रकारची तालवाद्य वाजवून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले - देवगाव प्राथमिक शाळेचा आदिवासी शाळकरी विद्यार्थी आर्यन भांगरे याचा विशेष गौरव करण्यात आला. या प्रसंगी आघाडीचे ढोलकीपटू विजय चव्हाण आणि १३ वर्षीय आर्यनच्या जुगलबंदीचा प्रयोग रंगला.
गायिका दीपिका भिडे-भागवत यांच्या उप-शास्त्रीय भक्ती संगीत कार्यक्रमाने 'गगन सदन तेजोयम'ची दिवाळी पहाट सुरु झाली. 'जय जय राम कृष्ण हरी...' या भागवत संप्रदाच्या मंत्राने वातावरण मंगलमय झाले. त्यानंतर 'सुंदर ते ध्यान...', 'आनंदाचा कंद हरि हा देवकी नंदन पाहिला...', 'गोविंद गोविंद मना लागलिया छंद...', 'श्रीअनंता मधुसूदना...', 'तुज पाहता सामोरी...' आदी अवीट गोडीच्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची अनुभूती रसिकांनी दीपिका भिडे यांच्या स्वरांतून अनुभवली. 'आनंदाचा कंद' असं शीर्षक असलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी केले.