मुंबई : नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर ॲवॉर्ड - २०२१ हा जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार डॉ. फारूक अब्दुला यांच्या हस्ते महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना प्रदान करण्यात आला.
जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये झालेल्या ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी जम्मू आणि काश्मीरचे माजी पर्यावरण व वनसंपदामंत्री मिया अल्ताफ अहमद, ग्रीनटेक फाऊंडेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश्वर शरण, महापारेषणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) (प्रभारी) सुगत गमरे, वाशी परिमंडलाचे मुख्य अभियंता नसीर कादरी उपस्थित होते.
कंपन्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी व उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. सांघिक व्यवस्थापन आणि कंपनीच्या शाश्वत व निरंतर प्रगतीसाठी काम करणाऱ्या नेतृत्त्वाचा या पुरस्काराने गौरव केला जातो. या पुरस्काराबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिनेश वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे कंपनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
------------------------
फोटो ओळ : डावीकडून महापारेषणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) (प्रभारी) सुगत गमरे, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि वाशी परिमंडलाचे मुख्य अभियंता नसीर कादरी.