Join us

१८ विद्यार्थ्यांना माहेश्वरी स्कॉलर पुरस्कार प्रदान; श्रुती केला ठरली मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 6:20 AM

Maheshwari Scholar Award : श्रुतीने  ‘एनआयटी’, त्रिची येथून इंजिनिअरिंग करून अमेरिकेच्या व्हॉर्टन स्कूल येथून एम.बी.ए. केले आहे. शालेय व महाविद्यालयीन जीवनात विवध स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळविले आहेत. 

मुंबई : माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाद्वारे दरवर्षी दिला जाणारा ‘माहेश्वरी स्कॉलर पुरस्कार’ श्रुती केला हिला प्रदान करण्यात आला. मुंबईतील दादर भागात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.  यावेळी आनंद राठी समूहाचे संचालक आनंद राठी आणि मुंबईचे माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रापासून ते सीए, सीएस, यूपीएससी, पीएच. डी. आदी विविध अभ्यासक्रमांत प्रावीण्याने यश मिळविणाऱ्या आणि  सोबतच इतर क्षेत्रांतही सातत्याने सरस कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांची, कठिण  प्रक्रियेतून ‘माहेश्वरी स्कॉलर’ आणि ‘प्रॅामिसिंग स्कॉलर’ या पुरस्कारांसाठी निवड केली जाते. यावर्षी संपूर्ण देशातून व परदेशातून १३४ उच्चशिक्षित तरुणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता, त्यातून १८ विद्यार्थीं पुरस्कारांसाठी निवडले गेले. 

श्रुतीने  ‘एनआयटी’, त्रिची येथून इंजिनिअरिंग करून अमेरिकेच्या व्हॉर्टन स्कूल येथून एम.बी.ए. केले आहे. शालेय व महाविद्यालयीन जीवनात विवध स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळविले आहेत. भविष्यात ऊर्जाक्षेत्रात शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी पर्याय देण्याचा मानस तिने यावेळी बोलताना व्यक्त केला. श्रुती सध्या अमेरिकेत असल्याने तिच्या वतीने तिचे वडील डॉ. किशोर आणि आई डॉ. स्वाती केला यांनी पुरस्कार स्वीकारला. 

आजचे जग वेगाने बदलत आहे आणि यात स्वत:ला अपडेट ठेवणे  गरजेचे  असल्याचा सल्ला यावेळी काकाणी यांनी दिला. आनंद राठी, मंडळाचे अध्यक्ष अतुल लाहोटी यांनीही यावेळी  मार्गदर्शन केले.

टॅग्स :मुंबई