मुंबई - दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यंदा संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार शशिकला कैकिणी यांना तर ज्येष्ठ कलाकार पुरस्कार नीला भागवत यांना देण्यात येईल. ज्येष्ठ रंगकर्मी हा पुरस्कार इला भाटे यांना आणि उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक हा पुरस्कार नीरज शिरवईकर यांना देण्यात येणार आहे.
दरवर्षी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार २६ जानेवारी २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या गोखले सभागृहात होईल. उत्कृष्ट प्रवासवर्णन पुस्तकाचा पुरस्कार रवि वाळेकर यांना ‘इजिप्सी‘ या पुस्तकासाठी देण्यात येईल. उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री हा पुरस्कार वनिता खरात यांना तर संगीत-नाट्य रंगभूमीवरील उदयोन्मुख अभिनेत्रीचा पुरस्कार डॅा. गौरी पंडित यांना देण्यात येईल.
संगीत विशारद या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षेत दादर-माटुंगा भागातून प्रथम क्रमांक मिळवणारे डॅा. प्रबोध चोबे आणि कु. अदिती करंबेळकर यांना पुरस्कार देण्यात येतील. पुरस्कार वितरणानंतर ‘नायजेरियावर बोलू काही’ हा नायजेरियाच्या वास्तव्यातील रंजक किस्से सांगणारा मेधा अलकरी यांचा दृकश्राव्य कार्यक्रम होईल. या सोहळ्याला अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.