मुंबई : कोरोना व्हायरसमुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे मंडळाने नुकतीच उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती बैठकीत प्रत्येक रेल्वे विभागाला कोरोनाविषयी प्रवाशांमध्ये जागृती, उपाययोजना याची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे देशातील प्रत्येक रेल्वे विभागाला प्रवाशांच्या जनजागृतीसंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानक, परिसरात जनजागृती करणारे सूचना फलक स्थानिक भाषेत प्रदर्शित करण्यात यावेत, जेणेकरून प्रत्येकाला कोरोना, उपाययोजनांविषयी माहिती मिळेल, असे बैठकीत ठरले. प्रत्येक विभाग, उपविभाग, रुग्णालयात स्वच्छता राखण्यावर बैठकीत भर देण्यात आला. औषध फवारणी, धूरफवारणीलाही प्राधान्य देण्यात येईल. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या वतीने रेल्वे रुग्णालयांतील डॉक्टरांना आणि मेडिकल स्टाफला विशेष प्रशिक्षण देण्यात येईल.रेल्वे विभागात कोणालाही कोरोनाची बाधा असल्यास याची माहिती तत्काळ अधिकाऱ्यांना द्यावी, अशा सूचनाही रेल्वे मंडळाकडून प्रत्येक रेल्वे विभागाला देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचनांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वे प्रशासन करणार प्रवाशांमध्ये जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 5:41 AM