- स्नेहा मोरेमुंबई : गेल्या काही वर्षांत हेपेटायटीसचे प्रमाण वाढल्यामुळे ते नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनातर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत. जागतिक हेपेटायटिस दिनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणानी घेतलेल्या पुढाकार आणि लोकसहभागातूनच निदानाचे प्रमाण अधिक वाढू शकेल, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. यंदा ‘फाइंड द मिसिंग मिलियन्स’ अशी जागतिक हेपेटायटीस दिनाची संकल्पना आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी पुढाकार घेऊन हेपेटायटीसची चाचणी करावी. तसेच, प्रतिबंधात्मक उपाय आत्मसात करावेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.अन्न व पाणी हेच हेपेटायटीस पसरण्याचे प्रमुख कारण आहे. हेपेटायटीस व्हायरल इन्फेक्शनमुळे होत असल्याने त्या रोगजंतूच्या प्रकारानुसार त्याचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’ आणि ‘जी’ असे ६ प्रकारांत विभाजन केले आहे. या सहा प्रकारांच्या रोगजंतूंमुळे होणाऱ्या आजाराच्या गंभीरतेमुळे संपूर्ण जगभर हा चिंतेचा विषय होत आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार आतापर्यंत जगातील दोन अब्ज लोक हेपेटायटीसने बाधित झाले आहेत. जगातील प्रत्येक पंधरावी व्यक्ती या विषाणूने बाधित होत असते. जगभरात दरवर्षी ७ लाख लोक यामुळे मृत्युमुखी पडतात.हेपेटायटीसच्या जागतिक क्रमवारीत भारत देश पहिल्या १० मध्ये येत असून, ४ ते ८ टक्के लोक दरवर्षी या विषाणूने बाधित होतात. याविषयी अधिक माहिती देताना ज्येष्ठ डॉ. समीर शहा यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाल्यापासून कावीळ झालेले अनेक रुग्ण भरती झाले असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.तर डॉ जयंत बर्वे यांनी सांगितले की, हेपेटायटीस सहा प्रकारच्या विषाणूंमुळे होत असला, तरी वैद्यकीय क्षेत्रात हेपेटायटीस ‘बी’ हा सर्वात जलद गतीने पसरतो. शरीरातील द्र्रवाशी संपर्क आल्याने (रक्त, लाळ, विर्य किंवा मूत्र) हेपेटायटीस बी म्हणजेच काविळीचा संसर्ग होतो, परंतु सामान्यामध्ये याविषयी जागरूकता आलेली नाही. एखाद्या शुष्क असलेल्या रक्ताच्या थेंबात हेपेटायटीस बी चा विषाणू सहा दिवसांपर्यंतही जिवंत राहू शकतो आणि दुसºया शरीरात संक्रमितसुद्धा होऊ शकतो. कावीळ झाली आहे किंवा होणार आहे किंवा नुसता काविळीचा संशय जरी आला, तरी लोक प्रथम धाव घेतात ती हकीम किंवा वैद्याकडे. आपल्या देशात काविळीवर अॅलोपथीमध्ये काहीही औषध नाही, हा समज किंवा गैरसमज बºयाच प्रमाणात पाळेमुळे घट्ट रोवून बसला आहेलक्षणे : हेपेटायटिसची लागण झालेल्या काही जणांमध्ये लक्षणे दिसून येत नाही. काहींमध्ये ती दिसून येतात. भूक न लागणे, मळमळणे आणि उलट्या, अतिसार, गडद रंगाची लघवी आणि पांढुरक्या रंगाची विष्ठा, पोटदुखी, कावीळ, त्वचा व डोळे पिवळसर होणे.डॉ. बरूच ब्लूमबर्ग यांनी लावला शोध : जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. बरूच ब्लूमबर्ग यांनी ‘हेपेटायटीस ई’ या विषाणूचा शोध लावला. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २८ जुलै हा दिवस जागतिक हेपेटायटीस दिवस म्हणून ओळखला जातो. संसर्गजन्य एचआयव्ही, टीबी, मलेरिया या रोगांची ज्याप्रमाणे जनजागृती झाली आहे, त्याच धर्तीवर हेपेटायटीसबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे.
रोगनिदान वाढण्यासाठी जनजागृती महत्त्वाची, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 2:07 AM