घरगुती गॅससंबंधी सुरक्षा, धोके यासंबंधी प्रात्यक्षिकातून जनजागृती
भुलेश्वर येथे अग्निसंरक्षण शिबिर उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भुलेश्वर येथील कबूतरखाना चौक येथे आगीपासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे; शिवाय घरगुती गॅससंबंधित सुरक्षा व धोके यासंबंधी प्रात्यक्षिकांतून मेमनवाडा अग्निशमन केंद्राकडून नागरिकांची जनजागृती करण्यात आली. गॅसमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यावर उपाययोजना कशा प्रकारे कराव्यात. आपत्कालीन विभागाशी कसा संपर्क साधावा याबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. मुंबईत आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर दिव्या फाउंडेशन व क्रिसेंट गॅस एजन्सी यांच्यातर्फे व प्रभाग क्रमांक २२१ मधील नगरसेवक आकाश राज पुरोहित यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
मेमनवाडा अग्निशमन केंद्र अधिकारी व इतर जवानांनी प्रात्यक्षिक देऊन नागरिकांना स्वतःची काळजी कशी करावी याची माहिती दिली. प्रात्यक्षिकांत नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. या प्रात्यक्षिक शिबिरात परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अग्निशमन दलासाठी १०१ व गॅस एजन्सीसाठी १९०६ या क्रमांकावर संपर्क करावा. घरगुती गॅससंबंधी सुरक्षा कशी करावी, याची माहिती वरिष्ठ केंद्र अधिकारी विश्वास पांगारकर यांनी यावेळी दिली.
आकाश राज पुरोहित यावेळी म्हणाले की, कोरोनादरम्यान अग्निशमन दलाने मोलाचे काम केले. त्यांना सलाम आहे. माझ्या २२१ विभागामध्ये भुलेश्वर येथील कबूतरखाना चौक येथे नागरिकांना घरगुती गॅस सुरक्षासंबंधी प्रात्यक्षिके दाखविली, याबद्दल त्यांचे आभार मानतो. याप्रसंगी महामंत्री अभिजित चव्हाण, साहाय्यक विभागीय अग्निशमन दल अधिकारी भोसले, वरिष्ठ स्थानक अधिकारी कुडतरकर, पांगारकर, पवार, नूतन सोनी, रोहित अध्यारू, अलोक तिवारी, मेमनवाडा अग्निशमन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.