Join us

ेसागरी दहशतवादी हल्ल्याचे मळभ दूर

By admin | Published: January 20, 2015 11:05 PM

गुजरातच्या समुद्रात संशयित पाक दहशतवादी बोटीच्या स्फोटाच्या घटनेनंतर पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यालगतच्या गावांत तसेच मच्छिमारांत भीती निर्माण झाली होती.

बोर्डी : गुजरातच्या समुद्रात संशयित पाक दहशतवादी बोटीच्या स्फोटाच्या घटनेनंतर पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यालगतच्या गावांत तसेच मच्छिमारांत भीती निर्माण झाली होती. परंतु १९ जानेवारीला तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट गस्ती नौका डहाणूत दाखल झाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. २० जानेवारीला डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी, उपवनसंरक्षक यांच्या ताफ्याने या हॉवर क्राफ्टमधून सागरी सुरक्षेची पाहणीही केली.३१ डिसेंबरच्या उत्तररात्री शक्तिशाली स्फोटके घेऊन गुजरातच्या सागरी हद्दीत शिरलेली आणि स्फोटात नष्ट करण्यात आलेली नौका दहशतवाद्यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यालगत गावामध्ये राहणारे नागरीक आणि खोल समुद्रात मासेमारी करीता जाणाऱ्या मच्छीमारांमध्ये भीती पसरली होती. पालघर जिल्ह्यातील झाई गाव महाराष्ट्र गुजरात राज्याची सागरी सीमा आहे. येथून गुजरात समुद्रातील घटनास्थळ जवळ असून २६/११ ला मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी याच सागरी मार्गाचा वापर करून आले होते. डहाणू-तलासरी तालुक्यातील आदिवासी नागरीक गुजरातच्या मासेमारी बंदरातून खलाशाचे काम करतात. त्यापैकी अनेक खलाशांनी पाक कैदेत शिक्षा भोगली असून कित्येकजण आजही खितपत पडले आहेत. त्यामुळे नागरीक मच्छीमार व त्यांच्या कुटूंबीयांच्या मनावर समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याची भीती होती.डहाणूत २२ मार्च २०१२ रोजी भारतीय तटरक्षक ठाण्यांची स्थापना झाली. डहाणू तहसिल कार्यालयानजीक आणि तेथून दहा कि. मी. अंतरावर चिखले गावच्या समुद्रकिनाऱ्यालगत वीस एकर जमिनीवर तटीय सुरक्षा पायाभूत सुविधांचे विकासकाम तटरक्षक दलाने हाती घेतले आहे. आगामी काळात अनेक छोट्या गस्ती नौका, हॉवर क्राफ्ट जहाजे डहाणू समुद्रकिनाऱ्यावरून या संपूर्ण सागरी सुरक्षेकरीता कार्यान्वित केली जाणार असल्याचे तटरक्षक दलाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेस मजबूती मिळणार असून खोल समुद्रातील मच्छीमारांना तत्काळ मदत मिळणार आहे. त्यामुळेच डहाणूतील हॉवरक्राफ्टच्या आगमनाने नागरीक व मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे, उपवन संरक्षक मल्लीकार्जुन याच्यासह हॉवरक्राफ्टमधून येथील सागरी सुरक्षेची पाहणी तटरक्षकदलाने नुकतीच केली. (वार्ताहर)