लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने महापालिकेने लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. त्यानुसार दररोज किमान एक लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. मात्र सुमारे चारशे केंद्रांवर लस देण्यात येणाऱ्या नागरिकांपैकी तब्बल २५ टक्के मुंबईबाहेरील आहेत. स्थानिक मागे राहिले आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या आसपासच्या शहरांतून मुंबईत नोकरी-धंद्यानिमित्त येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांचे लसीकरणही मुंबईतच होत आहे.
मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ५२ लाख ७४ हजार नागरिकांना लस देण्यात आली. यामध्ये १० लाखांहून अधिक लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर सुमारे ३२ लाखांहून अधिक लोकांनी पहिला डोस घेतला. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येत्या तीन ते चार आठवड्यांत येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सर्व मुंबईकरांना लस देऊन कोरोनामुक्त करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र दररोज लस घेणाऱ्या लोकांमध्ये एकूण मुंबईकर किती याबाबत पालिकेकडे ठोस आकडेवारी नाही.
मुंबई महानगर प्रदेशातून नोकरीधंदा, शिक्षण, व्यवसाय यानिमित्त लाखो लोक मुंबईत येत असतात. मुंबईतील अनेक खासगी कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यावर भर दिला आहे. खासगी लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत सुमारे १२ लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. कोविन ॲपवर संबंधित व्यक्तीच्या पत्त्याची नोंद होत नसल्याने किती मुंबईकरांनी लस घेतली? हे सांगणे कठीण आहे. संपूर्ण मुंबईत लसीकरण पूर्ण करण्यासाठी लोकसंख्येपेक्षा २० टक्के अधिक लसीकरण करावे लागेल, असे मत आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केले.
सुमारे पावणेदोन कोटी नागरिकांचे लसीकरणnकोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबईतील सुमारे पावणेदोन कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.nदररोज एक लाखाहून अधिक लोकांना लस देण्याचे लक्ष्य आहे. मुंबईतील महापालिका, सरकारी आणि खासगी अशा ३९१ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.nआतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील १७ लाख लोकांनी लस घेतली आहे.