उद्धव यांच्याऐवजी नारायण राणे गाडीतून उतरल्याने शिवसैनिकांची पंचाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 01:15 PM2018-03-30T13:15:18+5:302018-03-30T13:15:18+5:30
उद्धव ठाकरे येणार म्हणून सगळे माध्यम प्रतिनिधी, कॅमेरामॅन, आणि सोबत शिवसेनेचे बहुतांश आमदार पायऱ्यांवर वाट बघत थांबले होते.
मुंबई: शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात 36 चा आकडा असल्याची बाब सर्वश्रूत आहे. त्यामुळे समोरासमोर आल्यानंतर शिवसैनिक आणि नारायण राणे परस्परांशी बोलणे तर सोडाच पण एकमेकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. परंतु, दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका योगायोगामुळे नारायण राणे आणि शिवसैनिकांना प्रचंड अवघडल्यासारखे झाले. त्याचे झाले असे की, शिवसेना आमदारांच्या विकास निधीसंदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानभवनाच आले होते.
मात्र, उद्धव ठाकरे विधानभवनात येण्यापूर्वी याठिकाणी एक धमाल किस्सा घडला. उद्धव ठाकरे येणार म्हणून सगळे माध्यम प्रतिनिधी, कॅमेरामॅन, आणि सोबत शिवसेनेचे बहुतांश आमदार पायऱ्यांवर वाट बघत थांबले होते. त्यांच्यासोबत खास मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून भाजपचे आमदार प्रसाद लाडही पुष्पगुच्छ घेवून वाट पहात थांबले होते. अर्धा-पाऊण तास वाट पाहिल्यावर एक मर्सिडीज गाडी गेटवर आली. माध्यमांचे प्रतिनिधीही गेटकडे धावले. त्यामुळे सगळे फोटोग्राफर तिकडे पळाले. सोबतच शिवसेनेचे आमदारही तिकडे धावतात. प्रसाद लाडही धावतच गेटकडे गेले. माध्यमांचे कॅमेरे फोटो घेण्यासाठी सज्ज झाले. तोच गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरले नुकतेच खासदार झालले माजी मुख्यमंत्री नारायण राणे. साहजिकच नारायण राणे यांना पाहून शिवसैनिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसरीकडे हा संपूर्ण प्रकार पाहून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हसू आवरत नव्हते. त्यामुळे गाडीतून उतरलेल्या नारायण राणे यांना बराचवेळ सर्वजण का हसताहेत, याचा उलगडा होत नव्हता. तेव्हा प्रसाद लाड यांनी पुढे होत हसतच नारायण राणेंचे स्वागत केले. परंतु, यावेळी शिवसैनिकांचे चेहरे मात्र बघण्यासारखे झाले होते.
दरम्यान, या सगळ्यानंतर उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊच शकली नाही. एरवी इतरांना ताटकळत ठेवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत बसण्याची पाळी आली. शिवसेना आमदारांच्या विकास निधीसंदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार होते. या भेटीमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा दिलजमाई होणार, असे चित्रही अनेकांकडून रंगवण्यात आले होते. परंतु मुख्यमंत्री विधानसभेच्या कामकाजात अडकून पडल्याने ही भेट होऊ शकली नाही. विधान भवनाजवळील शिवसेनेच्या कार्यालयात दीडएक तास वाट पाहून उद्धव मग ‘मातोश्री’वर परतले.