मुंबई: 'सांताक्रूझचा ज्येष्ठ नागरिक' अशी ओळख असलेल्या अफ्रिकन प्रजातीच्या तब्बल ३०० वर्षे पुरातन बाओबाब वृक्षावर मेट्रो प्रकल्पासाठी कुऱ्हाड चालवण्यात आली. याहीपुर्वी या वृक्षावर संक्रांत आली होती. पण या भागातील नागरिकांच्या सजगतेमुळे झाडाच्या अस्तित्वाला धक्का लागला नाही. यावेळी मात्र रात्रीच्या अंधारात झाडाचा बळी घेतला गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरणवाद्यांनी रविवारी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.
सांताक्रूझच्या एस.व्ही. रोडवरील हा वृक्ष या भागाची वेगळी ओळख बनला होता . ४० फुट उंचीच्या या वृक्षाला स्थानिक नागरिक 'सांताक्रूझचा जेष्ठ नागरिक' असे संबोधत! मुंबईत या प्रजातीचे चार वृक्ष असून त्यापैकी एक भायखळा येथील वीरमाता जिजामाता उद्यानात आहे. सांताक्रूझ येथील हा वृक्ष तोडण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून सुरु होते. १९७९ साली असा प्रयत्न झाला; तेव्हा स्थानिकांनी तो हाणून पाडला होता. त्यावेळी वृक्ष वाचवण्याच्या आंदोलनात अगदी शाळकरी मुलेही सहभागी झाले होते. या झाडाशी स्थानिकांशी भावनिक नाते निर्माण झाले होते. वृक्षाचा बळी गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 'मेट्रो २-ब' साठी वृक्ष तोडण्यात आला आहे. या झाडाचे पुनर्रोपण करता येते. असे असताना थेट झाड तोडण्याची काहीही गरज नव्हती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
वृक्षाचे वैशिष्ट्य
या झाडाची प्रजाती मूळची आफ्रिकेच्या मादागास्कर येथील आहे. या झाडाचे खोड प्रचंड मोठे असते. हे झाड हजारो वर्षे जगते असे सांगतात. अफ्रिकेत या झाडाच्या बुंध्यात लोक घरे करून राहतात अशीही माहिती मिळाली. झाडाच्या प्रचंड आकारामुळे परिसरात थंडावा जाणवतो. मुंबईत, पेडर रोड , टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, जिजामाता उद्यान आणि सांताक्रूझ असा चार ठिकाणी हे वृक्ष आहेत.