आक्सा, मढ किनाऱ्यांवर धाडसत्र
By admin | Published: August 9, 2015 03:27 AM2015-08-09T03:27:05+5:302015-08-09T03:27:05+5:30
मालवणी पोलिसांनी मढ, आक्सा आणि दानापानी किनाऱ्यांवर धडक कारवाई करत १३ प्रेमी युगुलांसह तब्बल ६४ जणांना कारवाई केली. यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तीन
मुंबई : मालवणी पोलिसांनी मढ, आक्सा आणि दानापानी किनाऱ्यांवर धडक कारवाई करत १३ प्रेमी युगुलांसह तब्बल ६४ जणांना कारवाई केली. यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली. या कारवाईचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे. मात्र कारवाई झालेल्यांनी ही पोलिसांची मनमानी असल्याचा गळा काढला आहे.
किनाऱ्यांवर पर्यटक दारू पिऊन धिंगाणा करतात त्यांचा स्थानिक महिलांना त्रास होतो. लॉजमध्ये काही तासांसाठी खोल्या घेतल्या जातात, काही लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालतो.या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा येथे वावर असतो, अशा तक्रारी स्थानिकांनी मालवणी पोलीस ठाण्यात दिल्या होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. तर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी पुन्हा येथे धाड घातली. त्या वेळी किनाऱ्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणारे अनेक जण आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी येथील लॉजमध्ये धाडी घातल्या. त्यात १३ युगुले सापडली, तर तीन लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी तीन महिलांना पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली. उर्वरितांकडून १२०० रुपये दंड आकारून सोडून दिले.
दारू पिऊन किनाऱ्यांवर धिंगाणा करणे, दारूच्या नशेत स्थानिकांशी हुज्जत घालणे किंवा त्यांची छेड काढणे, तसेच वेश्याव्यवसाय या प्रकाराने भविष्यात गंभीर गुन्हे घडू शकतात. अशा अपप्रवृत्तींवर वेळीच कारवाई करणे यात काहीही गैर नसल्याची प्रतिक्रिया मुंबई पोलीस दलाकडून देण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईचा सोशल मीडियावरून निषेध व्यक्त होत आहे. आमच्या मर्जीने लॉजमध्ये थांबलो होतो. मग सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य केल्याचा प्रश्नच येतो कुठे, असा सवाल कारवाई झालेल्या युगुलांनी केला. ज्याच्यासोबत लग्न ठरले आहे त्याच्यासोबत एकांताचे क्षण घालविणे गुन्हा आहे का, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.
तक्रारींनुसार कारवाई केली. किनाऱ्यांवर किंवा किनाऱ्यांना लागून असलेल्या लॉजमध्ये थांबलेल्या सर्वच पर्यटकांवर कारवाई केलेली नाही. ज्यांनी गैरवर्तन केले त्यांच्यावर बडगा उगारला.
- मिलिंद खेतले, वरिष्ठ निरीक्षक, मालवणी