मुंबई : आॅगस्ट महिना उजाडूनही हजारो विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई विद्यापीठाने तीनही डेडलाइन न पाळल्यामुळे, आता राजभवनने याची गंभीर दखल घेत, बदल्या करून प्रभारी व्यक्तींच्या खांद्यावर विद्यापीठाची धुरा सोपवली आहे. बुधवारी अजून एक बदली करण्यात आली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदाची प्रभारी सूत्रे ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अर्जुन घाटुळे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे आता विद्यापीठातील सर्व महत्त्वाच्या पदांचा कारभार प्रभारी खांद्यावर आहे.बुधवारी झालेली नेमणूक ही गेल्या आठवड्याभरातली तिसरी नेमणूक आहे. पहिल्यांदा कुलगुरूपदाची अतिरिक्त जबाबदारी डॉ. देवांनद शिंदे आणि त्यानंतर प्र-कुलगुरूपदी धीरेन पटेल यांच्याकडे प्रभारी म्हणून सूत्रे देण्यात आली होती. जूनअखेरपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांचे सर्व निकाल जाहीर होतात. यंदा मात्र आॅगस्ट महिना उजाडूनही उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी तणावात आहेत. मुंबई विद्यापीठाचे डॉ. संजय देशमुख यांनी यंदापासून आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतला. मात्र, तो फसल्याने निकाल गोंधळ सुरू आहे.जून महिना संपूनही निकाल जाहीर न झाल्याने, राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वत: लक्ष घालून विद्यापीठाला ३१ जुलैची पहिली डेडलाइन दिली होती. ती चुकल्यावर पाच दिवसांची मुदतवाढ मिळाली. ५ आॅगस्टलाही विद्यापीठ निकाल लावण्यास अपयशी ठरले.या सर्व प्रकारांमुळे राज्यपालांनी कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. यानंतर प्र-कुलगुरू पदाची प्रभारी सूत्रे व्हीजेटीआयचे संचालक डॉ. धीरेन पटेल यांच्यावर सोपविली. काही दिवसांपूर्वीच सध्याचे संचालक दीपक वसावे यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर बुधवारी सरकारने नियुक्तीचा निर्णय घेतला. नवीन संचालकांची निवड होईपर्यंत किंवा तीन महिन्यांसाठी घोटुळे यांना हा प्रभारी भार सांभाळावा लागेल. ते शुक्रवारपासून ते कामकाजाला सुरुवात करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.>ग्राहक न्यायालयाकडे दाद मागणारबुधवारी तिसरी डेडलाईन चुकूनही विद्यापीठाने केवळ एकच निकाल जाहीर केला. आतापर्यंत विद्यापीठाने ३३४ निकाल जाहीर केले आहेत. विद्यापीठाला १४३ निकाल जाहीर करायचे आहे. बुधवारी ६९८ प्राध्यापकांनी ११ हजार ४९७ उत्तरपत्रिकांची तपासणी केली.विद्यापीठाने बीएससी स्टॅटिस्टिकचा निकाल जाहीर केला आहे. खालसा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. परंतु एका विद्यार्थिनीचा निकाल जाहीर झालेला नाही. तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असल्याचे मनविसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ग्राहक न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला झालेल्या विलंबामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी विशेष अधिकार वापरून विशेष अधिकाºयांची नेमणूक केली होती; पण आता होणाºया बदल्यांमुळे विशेष अधिकाºयांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मुंबई विद्यापीठात सुरूअसलेल्या निकाल गोंधळामुळे राज्यपाल आता अन्य विद्यापीठांतील व्यक्तींना विद्यापीठात पाचारण करीत आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा ताबा अन्य विद्यापीठांतील व्यक्तींच्या हाती जात असल्याची चर्चा सुरू आहे.
धुरा ‘प्रभारी’ खांद्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:50 AM