आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या घरात कोट्यवधीचे घबाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:12 AM2017-07-29T05:12:05+5:302017-07-29T05:12:18+5:30
सामान्यांच्या करआकारणीकडे लक्ष ठेवून असणाºया आयकर विभागातील अधिकाºयानेच कोट्यवधीचे घबाड लपवून ठेवल्याची खळबळजनक माहिती सीबीआयने शुक्रवारी दाखल केलेल्या गुन्ह्यातून समोर आली
मुंबई : सामान्यांच्या करआकारणीकडे लक्ष ठेवून असणाºया आयकर विभागातील अधिकाºयानेच कोट्यवधीचे घबाड लपवून ठेवल्याची खळबळजनक माहिती सीबीआयने शुक्रवारी दाखल केलेल्या गुन्ह्यातून समोर आली. या प्रकरणी मुंबई आयकर विभागातील टीडीएस विभागाचे अतिरिक्त आयुक्त विवेक बत्रासह पत्नी प्रियांका आणि अन्य तिघांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले. याच प्रकरणात शुक्रवारी सीबीआयने त्याच्या मुंबईसह ठाणे, सिल्व्हासा, गोवा, दिल्लीतील १० ठिकाणांवरील घर, कार्यालयांवर छापे टाकले.
विवेक बत्रा हे १९९२ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते सध्या आयकर विभागाच्या टीडीएसचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. कामाच्या कालावधीत त्यांनी बेनामी मालमत्ता बाळगल्याबाबत सीबीआयकडे तक्रार आली होती. १ एप्रिल २००८ ते ३० एप्रिल २०१७ दरम्यान त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केली. ही मालमत्ता त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या नावावर आहे. त्यांच्याकडे एकूण ६ कोटी ७९ लाख ५१ हजार ११६ रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आढळून आली. मात्र एवढी मालमत्ता कशी व कोठून आली याबाबत ते स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यामुळे सीबीआयने शुक्रवारी बत्रा यांच्या पत्नी प्रियांका, सीए शिरीष शहा, विराज प्रोफाइल लिमिटेडचे एमडी नीरज कुमार, अलोक इंडस्ट्रिजचे संचालक दिलीप जिवारजीका यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने त्यांच्या मुंबईसह ठाणे, गोवा, सिल्व्हासा आणि दिल्ली येथील १० ठिकाणांवरील घर, कार्यालयांवर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे, अन्य पुरावे गोळा केले आहेत.