Join us  

Ayodhya: जय श्री राम... राज यांचा दौरा रद्द, पण आदित्य ठाकरे अयोध्येला जाणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 10:18 AM

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाला असला तरी 5 जून रोजी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले.

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा प्रकृती उपचारामुळे रद्द करण्यात आला. मनसेनं या दौऱ्याची जोरदार तयारी केली होती. मात्र, युपीचे खासदार बृजभूषणसिंह यांचा वाढता विरोध आणि ऐनवेळी समोर आलेली पायावरील शस्त्रक्रियेमुळे राज यांचा दौरा स्थगित झाला. मात्र, शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा 15 जून रोजी होत आहे. याबाबत, खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटवरुन माहिती दिली. जय श्री राम... असे म्हणत राऊतांनी अयोध्या दौऱ्याबाबत सांगितलं. 

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाला असला तरी 5 जून रोजी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. त्यामुळे, मनसेनं आपल्या शिलेदारास पाठवून राज ठाकरेंचा दौरा पूर्णत्वास नेल्याचं सांगितलं जात आहे. आता, आदित्य ठाकरेंचा 15 जून रोजीच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे हे अयोध्येला पोहचण्यापूर्वी शिवसेनेचे काही नेते अयोध्येत जाऊन तेथील तयारीचा आढावा घेतील. त्यामध्ये खासदार संजय राऊत असणार आहेत. तर, आदित्य ठाकरे यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यासह अन्य नेतेमंडळी व पदाधिकरी असणार आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन, आदित्य ठाकरे 15 जून रोजी शेकडो शिवसैनिकांसमवेत राम लल्लाचे दर्शन करणार आहेत, अशी माहिती दिली. तसेच, आदित्य हे इस्कॉन मंदिरालाही भेट देणार असून काही प्रमुख लोकांना भेटणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, रामलल्लाच्या दर्शनाला कोणीही जाऊ शकते. हा आमचा धार्मिक कार्यक्रम असून राजकीय नाही. शिवसेना आणि अयोध्या यांचे एक भावनिक नातं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अयोध्या दौऱ्यावर गेले होते. राज्यात रामराज्य आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे राऊत म्हणाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाल्यानंतर त्यांना टोला लगावला आहे. काही पक्षांचे देखील अयोध्येत कार्यक्रम होते. मात्र, त्यांनी ते रद्द केले. त्यांना जर काही सहकार्य हवे असते तर आम्ही केले असते, असा टोलाच राऊत यांनी लगावला. 

टॅग्स :आदित्य ठाकरेसंजय राऊतशिवसेनाअयोध्या