Join us

कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून अयोध्या पौळ मैदानात?, सोशल मीडियावरुन दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 2:10 PM

अयोध्या पौळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी दिल्याची माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची जोरदार तयारी सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गट मोठा चेहरा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत ठाकरे गटात चर्चाही सुरू आहेत. दरम्यान, आज ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी कल्याणमधून उमेदवारी मिळाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसला आयकर विभागाकडून दिलासा! निवडणुकीपर्यंत कारवाई करणार नाही

अयोध्या पौळ यांचे ट्विट काय?

"आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने #मशाल चिन्हावर शिवसेनेकडून #कल्याण लोकसभा लढवत आहे..🚩💪

ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या #खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आदरणीय साहेब, आदित्यजी ठाकरे, संजयजी राऊत साहेब, वरुणजी सरदेसाई, साईनाथजी दुर्गे', असं ट्विट अयोध्या पौळ यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी उमेदवारीबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. 

हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात  चर्चेचा विषय ठरत  आहे.मात्र १ एप्रिल रोजी ही पोस्ट व्हायरल होत असल्याने यावर एप्रिल फुल अशा कमेंटही आल्या आहेत. यामुळे ही पोस्ट एप्रिल फुलसाठी केली असल्याचे नेटकरी कमेंट करत आहेत. 

ठाकरे गटाकडून  याआधीही अनेक नाव चर्चेत

कल्याण लोकसभेसाठी  ठाकरे गटाकडून या आधी सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुभाष भोईर,केदार दिघे यांचं नाव चर्चेत होतं. आता अयोध्या पोळ यांचही नाव समोर आलं आहे. अयोध्या पोळ यांच्या ट्विटर  अकाऊंटवर ही पोस्ट  दुपारपर्यंत तरी दिसत होती.त्यानंतर याविषयी अधिकृतपणे माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना वारंवार संपर्क करण्यात आला. मात्र, त्यांचा फोन हा बंद असल्याचं  दिसून आलं. त्यामुळे पोळ यांच्या कल्याण लोकसभेच्या पोस्ट विषयी  अधिक माहिती मिळू शकली नाही. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मशाल चिन्हावर कल्याण लोकसभा निवडणूक लढवत आहे अस या ट्विट मध्ये अयोध्या यांनी म्हटलं आहे. 

अयोध्या पौळ यांचा फोन बंद

अयोध्या पौळ यांचं ट्विट समोर आल्यानंतर आम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी आम्ही त्यांना फोन केला तर त्यांचा फोन बंद लागत होता.  यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर अयोध्या पौळ या मातोश्री सोबत राहिल्या. त्यांनी विरोधकांना आक्रमक शैलीत  प्रत्युत्तर दिली. पौळ या आपल्या रोखठोक मतांमुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहिल्या आहेत.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४कल्याण