Join us

स्वागतासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करु; अयोध्या दौऱ्याआधी विहिंपच्या नेत्यांचं राज ठाकरेंना आश्वासन

By मुकेश चव्हाण | Published: February 01, 2021 3:53 PM

मनसेचे आमदार राजू पाटील फेसबुकद्वारे म्हणाले की, विश्व हिंदू परिषदच्या प्रमुख पधादिकाऱ्यांनी आज राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली.

मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी पुढील महिन्यांमध्ये अयोध्येचा दौरा आयोजित केला असून, या दौऱ्याआधी विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सध्या अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी सुरु असलेल्या निधी संकलनाच्या कार्यक्रमाबाबत विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना माहिती दिल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. 

मनसेचे आमदार राजू पाटील फेसबुकद्वारे म्हणाले की, विश्व हिंदू परिषदच्या प्रमुख पधादिकाऱ्यांनी आज राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली. सध्या अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम सुरू आहे. राज ठाकरेंना पधादिकाऱ्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.

राज ठाकरे यांनी या कार्यक्रमासाठी मदत स्वतः अयोध्येला जाऊन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांना त्यांच्या अयोध्या भेटीसाठी आमच्याकडून कुठलीही मदत लागल्यास ती आम्ही करू. त्यांच्या स्वागताच्या दृष्टीने जे काही नियोजन आणि तयारी करायची आहे, त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत, असंही विश्व हिंदू परिषदेचे नेते सालेकर यांनी सांगितले.

विश्व हिंदू परिषद च्या प्रमुख पधादिकाऱ्यांनी आज राजसाहेबांची कृष्णकुंज वर भेट घेतली.

सध्या अयोध्या राम मंदिर...

Posted by Raju Patil - Pramod Ratan Patil on Monday, 1 February 2021

मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी दिली. येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं समजतंदरम्यान, राममंदिराच्या निधी संकलनाचा कार्यक्रम सध्या विश्व हिंदू परिषद आणि भाजपसारख्या संघटना राज्यात राबवत असून वेगवेगळ्या संस्था ट्रस्ट यांच्या माध्यमातून दानशूर लोकदेखील मंदिराच्या उभारणीसाठी लाखो रुपयांचा निधी देत आहेत. या मंदिराच्या उभारणीच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदमधील काही नेत्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. 

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...

राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. प्रभू राम हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटून आता तिथे भव्य राम मंदिर उभारले जात आहे. त्यामुळे सर्वांनीच अयोध्येला जायला हवे. मी स्वतः अयोध्येला जाणार आहे, असं माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल - प्रवीण दरेकर

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, शिवसेनेत असतानाही राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका राहिलेली आहे. अयोध्येत जाऊन राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल. 

मनसेची नक्की भूमिका काय, हे राज ठाकरेही सांगू शकत नाही- काँग्रेस

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, तो त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. कुणी कुठेही जाऊ शकतं. मनसेची भूमिका काय असते हे राज ठाकरेही सांगू शकत नाहीत. जे झेंडे बदलतात त्यांच्याविषयी काय बोलणार, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेअयोध्यामहाराष्ट्र