मुंबई - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. अयोध्या निकाल आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. यामधील एका प्रकरणावर बाळासाहेबांवरही खटला चालला, गुन्हा दाखल झाला. गेल्या वर्षभरापासून मंदिराच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. हे आंदोलन एका पक्षाचे नव्हते, यामध्ये सर्वपक्षाचे लोक होते असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांना भाजपाला लगावला आहे.
माध्यमाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मंदिराचा अध्यादेश आणावा अशी मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णयाची वाट बघा असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज निर्णय होतोय, तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायला हवा. हा निकाल सुप्रीम कोर्टाचा आहे, सरकारचा नाही असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच राज्यातील सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका कणखर शब्दात मांडली आहे. त्यामुळे याविषयावर आता मी बोलणार नाही. आजचा दिवस कोणत्याही राजकीय घडामोडींचा असणार नाही. उद्धव ठाकरेंना खोटं पाडणार असाल तर सहन करणार नाही. खोटं बोलणारे सत्तेत येणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे असा इशाराही संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. दरम्यान, खोटेपणाच्या विरोधात जो संताप उद्धव ठाकरेंनी मांडला तो ऐतिहासिक होता. त्यांच्या मनातील उद्रेक समोर आलं.
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील संताप बाहेर आला. महाराष्ट्रात खोट्याचं राजकारण सुरु आहे. उद्धव ठाकरेंना खोटं पाडण्याचं षडयंत्र रचलं गेलं. महाराष्ट्राने कधीही खोटं राजकारण चालू दिलं नाही. उद्धव ठाकरेंचे हे रुप पाहून आम्हीही आश्चर्यचकीत झालो अशा शब्दात संजय राऊत यांनी कौतुक केले आहे.
तत्पूर्वी सामना अग्रलेखातून शिवसेनेने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गर्भित इशारा दिला आहे. नवी राज्यव्यवस्था होईपर्यंत मावळत्या मुख्यमंत्र्यांचे सामानसुमान ‘वर्षा’ बंगल्यावर राहू शकते. ते ‘काळजीवाहू’ या बिरुदावलीने तिथे थांबतील, पण किती दिवस याचा निर्णय राज्यपालांना घ्यावाच लागेल. कारण काळजीवाहू सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत, पोलिसांना आदेश देण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे काळजीवाहूंचे राजकीय कार्यकर्ते म्हणून बडय़ा पोलीस अधिकार्यांना काम करता येणार नाही. असे कोणी करत असतील तर त्यांनी भविष्याचे भान ठेवावे हे आम्ही आजच बजावत आहोत असं सागण्यात आलं आहे.