Ayodhya Verdict - मुंबईकरांनी दाखवले सलोखा, संयमाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 05:36 AM2019-11-10T05:36:28+5:302019-11-10T05:48:31+5:30
अयोध्येतील राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सकाळी आपला ऐतिहासिक निकाल दिला.
मुंबई : अयोध्येतील राम मंदिरप्रकरणीसर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सकाळी आपला ऐतिहासिक निकाल दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र शांतता होती. कोठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही टोकाच्या प्रतिक्रिया देण्याचे मुंबईकरांनी टाळले. विशेषत: व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर भावना भडकावणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड होणार नाहीत, याची काळजी अॅडमिन मंडळींनी घेतल्याचा अनुभव बहुतांश लोकांनी घेतला. एरवी आली पोस्ट की कर फॉरवर्ड धोरणाला आज लोकांनी सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळाले.
पोलिसांनी आधीच कलम १४४ अन्वये जमावबंदी आदेश लागू केला होता. तर सोशल मीडियातून भडक पोस्ट फॉरवर्ड होणार नाही यासाठी पोलिसांचा आयटी सेल सज्ज होता. मात्र, मुंबईकरांनी प्रसंगाचे गांभीर्य ध्यानात घेत संयत भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. विशेषत: छोट्या-मोठ्या राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांनी संयम राखत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. राम मंदिराच्या बाजूने निकाल आल्यानंतर शिवसेना, भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी निकालाचे स्वागत करतानाच जल्लोष करण्याचे मात्र टाळले.