मुंबई: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी देखील स्वागत केलं आहे.
लालकृष्ण आडवाणी म्हणाले की, अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आज दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. तसेच मी देवाचे आभार मानतो कारण मला अयोध्यासारख्या जनआंदोलनात सहभागी होण्याची संधी प्राप्त मिळाली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीनंतरचा अयोध्येचा निकाल सर्वोत मोठ लढा होता असं देखील लालकृष्ण आडवाणी यांनी सांगितले आहे.
राम मंदिरासाठी लालकृष्ण आडवाणींचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मी लवकरच अडवाणींची भेट घेणार असल्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहील आणि येत्या काही दिवसात येऊ घातलेले विविध धर्मांचे सण अतिशय उत्साहात साजरे होतील, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी भारतभक्तीचा उल्लेख केला. भारतभक्तीचा हाच भाव देशात दिसतो आहे. हाच खरा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आहे. नव्या भारताच्या उभारणीसाठी आपण सगळे एकजुटीनं प्रयत्न करू,' असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.