आयुर्वेद आणि अॅलोपथी एकत्र येणे आवश्यक- राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 05:18 PM2020-09-27T17:18:58+5:302020-09-27T17:19:29+5:30
केमो रिकवरी किटचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई- कॅन्सर सारख्या आजारावर आयुर्वेद आणि अलोपथी ह्यांनी एकत्र येऊन उपचार करणे रुगणांच्या हिताचे असून भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्ट द्वारा संशोधन करून पेटंट करण्यात आलेले केमो रिकवरी किट हे कॅन्सर रुगणांच्या जलद उपचारासाठी हे वरदायी ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोशियारी ह्यांनी राजभवनात झालेल्या किट लोकर्पण कार्यक्रमात बोलताना केले. ह्या कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, पद्मभूषण अशोक कुकडे, पद्मभूषण देवेंद्र त्रिगुणा, प्रमुख संशोधक वैद्य सदानंद सरदेशमुख, आदि मान्यवर ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.
"शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आयुर्वेद चिकित्सा पद्धतिमध्ये सातत्याने संशोधन करत राहण्याची गरज आहे. आयुर्वेदिक औषधाच्या निर्मितिसाठी फक्त मार्केटिंगच्या मागे न लागता संशोधनावर अधिक भर देण्याची सध्या आवश्यकता असल्याचे कोशियारी पुढे म्हणाले. कॅन्सरच्या उपचारासाठीच्या ह्या संशोधनाला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून द्यायला पेटंट उपयोगी पडणार असून टाटा ट्रस्ट ह्या मध्ये सहभागी असल्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण रतन टाटा ह्यांनी ह्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
ह्या किट द्वारे एकूण ७ पेटंट दाखल करण्यात आली असून त्यातील ४ प्रत्यक्ष प्रकाशनाच्या टप्प्यात आली आहेत. ह्या किट मध्ये प्रामुख्याने सुवर्णभस्म, प्रवाळयुक्त अशा विविध संशोधीत व टाटा रिसर्च सेंटर द्वारा प्रमाणित औषधंचा वापर करण्यात आला असून जवळपास १४,००० रुगणांवर आता पर्यंत ह्याची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. ट्रस्ट चे विश्वस्त वैद्य सुकुमार सरदेशमुख ह्यांनी आभार व्यक्त केले.