उपचारासाठी आयुर्वेदाकडे
By admin | Published: February 4, 2016 02:53 AM2016-02-04T02:53:19+5:302016-02-04T02:53:19+5:30
‘सिगारेटच्या व्यसनामुळे चार वर्षांपूर्वी मला कर्करोग झाला. टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या अशा रुग्णांच्या वेदना मी पाहिल्या.
- प्रवीण दाभोळकर
‘सिगारेटच्या व्यसनामुळे चार वर्षांपूर्वी मला कर्करोग झाला. टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या अशा रुग्णांच्या वेदना मी पाहिल्या. मला आॅपरेशन टाळायचे होते म्हणून मी उपचारासाठी आयुर्वेदाचा मार्ग निवडला आणि वरळी येथील रा.रा.आ. पोदार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये दाखल झालो...’ असे डिसोजा सांगतात. डिसोजा यांच्यासारखे अनेक रुग्ण कर्करोगावर उपचार आणि प्रतिबंध म्हणून आयुर्वेदाचा मार्ग अवलंबत आहेत. अॅलोपॅथीसोबतच आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या उपचार पद्धतींंचा घेतलेला आढावा...
२०१३ तील एका सर्व्हेनुसार, जगभरात ४०.८ टक्के कॅन्सर रुग्णांनी नियमित औषधांसोबत पर्यायी उत्पादनांची मदत घेतली. २०१५ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात भारतात कर्करोगासंबंधी आयुर्वेदात सर्वाधिक संशोधन करण्यात आले. २२.८ टक्के कर्करुग्ण हे उपचारासाठी आयुर्वेदावर विश्वास ठेवत असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या चार वर्षांत आर.आर.ए. पोदार आयुर्वेदिक कॅन्सर अनुसंधान संस्थानात रुग्ण दाखल होण्याची संख्या चार पटीने वाढली आहे. आयुर्वेदावर विश्वास असणारे, आॅपरेशनची भीती वाटणारे रुग्ण आयुर्वेदिक उपचार पद्धतींकडे वळतात. केमोथेरेपी आणि रेडिओथेरेपीचे साइड इफेक्ट असलेल्या रुग्णांची संख्या तुलनेत अधिक असते.
आयुर्वेदावर पूर्ण विश्वास असणारे, उपचारानंतर पुन्हा कर्करोग होऊ नये यासाठी दक्षता तसेच सर्व उपचार पद्धतींवरून जेव्हा विश्वास उडतो तेव्हा रुग्णांनी आयुर्वेदिक मार्ग स्वीकारलेला असतो. पोदार आयुर्वेदिक कॅन्सर अनुसंधान संस्थानचे डॉ. मनोहर गुंडेटी सांगतात, ‘इथे आलेल्या रुग्णांचे आयुर्वेदिक पद्धतीने परीक्षण केले जाते. त्यानुसार आयुर्वेदिक औषधाची योजना आणि पंचकर्माद्वारे उपचार केले जातात. आहारविहाराचा सल्ला देऊन समुपदेशन केले जाते. उपचारानंतरही रुग्णांकडून औषधांचा पाठपुरावा केला जातो. पोदार अनुसंधान संस्थान हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने माफक दरात सेवा पुरविली जाते. नि:शुल्क औषधे आणि मार्गदर्शन, पंचकर्म आदीचे माफक दर आकारले जातात. दारिद्र्यरेषेखालील रुग्णांसाठी सत्तर टक्के सवलत दिली जाते.’
कसा टाळता येऊ शकतो कर्करोग
सरळ साधे आयुष्य जगा, मन शांत ठेवा, खाण्या-पिण्याची सवयी बदलू नका, व्यायाम करा, तंबाखू सेवन करू नका, धूम्रपान, मद्यपान करणे टाळा, स्वच्छता ठेवा
देशासह जागतिक पातळीवर कर्करोग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जागतिक पातळीवर कर्करोगाचा पडणारा भार कमी व्हावा, यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच ‘जागतिक आरोग्य संघटने’ने २०१६ ते २०१८ या वर्षांसाठी ‘वी कॅन, आय कॅन’ हे घोषवाक्य ठेवले आहे. एकट्याने लढा देण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे, अशी संकल्पना आहे.