आयएमएच्या बंदविरोधात आयुष डॉक्टर आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 07:31 AM2020-12-12T07:31:51+5:302020-12-12T07:33:45+5:30
Doctor News : आयएमएने ११ डिसेंबरला पुकारलेल्या बंदचा मुंबईमध्ये फारसा परिणाम जाणवला नाही. मुंबईतील फोर्टीस, रिलायन्स, हिरानंदानी, हिंदुजा या महत्त्वाच्या खासगी रुग्णालयासह सरकारी रुग्णालयातील बाह्य विभाग सुरू राहिल्याने रुग्णसेवेवर फारसा परिणाम जाणवला नाही.
मुंबई : केंद्र सरकारच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने आयुर्वेदिक डॉक्टरांना ५८ शस्त्रक्रियेला परवानगी दिली आहे. या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील ॲलोपॅथी डॉक्टरांचे दवाखाने, क्लिनिक आणि ओपीडी बंद आहे. मात्र, याचा रुग्णांना कोणताही फटका बसणार नाही. आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी हजर-तत्पर असल्याचे म्हणत, आता ‘आयुष’ डॉक्टर पुढे आले.
आयएमएने ११ डिसेंबरला पुकारलेल्या बंदचा मुंबईमध्ये फारसा परिणाम जाणवला नाही. मुंबईतील फोर्टीस, रिलायन्स, हिरानंदानी, हिंदुजा या महत्त्वाच्या खासगी रुग्णालयासह सरकारी रुग्णालयातील बाह्य विभाग सुरू राहिल्याने रुग्णसेवेवर फारसा परिणाम जाणवला नाही. आयएमएच्या बंदचा निषेध करण्यासाठी मुंबईतील आयुष डॉक्टरांनी एकत्र येत, सायन आयुर्वेद रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करत, मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन केले. यात ७५पेक्षा अधिक युनिट रक्त संकलन करण्यात आले. हे सर्व रक्त आयुर्वेद रुग्णालयाकडे न ठेवता आर. मेहता रुग्णालयातील रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी पाठविण्यात आले. आयएमएच्या डॉक्टरांनी बंद पुकारला असला, तरी आरोग्यसेवेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी आयुष डॉक्टर पुढे सरसावले होते, तसेच आयुष डॉक्टरांनी गुलाबी फिती लावून आयएमएच्या बंदचा निषेध केला.