कृती समितीच्या झेंड्याखाली आझाद मैदानात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 01:37 PM2017-09-27T13:37:48+5:302017-09-27T13:58:52+5:30
गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे.
मुंबई - गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. हजारो अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. मंचावर कृती समितीचे निमंत्रक शुभा शमीम, एम. ए. पाटील, दिलीप उटाणे यांसह कामगार नेते कॉ प्रकाश रेड्डी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील उपस्थित आहेत.
अंगणवाडीच्या मोर्चात शिवसेनेचेही शक्तीप्रदर्शन
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शक्ति प्रदर्शनमध्ये शिवसेनाही शक्ती प्रदर्शन करणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधित करण्यासाठी आजाद मैदानावर येणार आहेत. यावेळी उद्धव यांच्यासोबत ३ खासदार आणि दोन मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती स्थानिक विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिली.
संबंधित नेत्यांमध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई व विनायक राऊत या खासदारांसह राज्यमंत्री दीपक केसरकर आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा समावेश असेल.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर कृती समितीने बँनरच्या माध्यमातून व्यंगात्मक टीका केली आहे.
- सरकारतर्फे अंगणवाडी सेविकांना १० हजार ५०० रुपये आणि मदतनीसांना ७ हजार रुपये मानधन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची घोषणा कृती समितीचे नेते भगवान देशमुख यांनी केली.