मुंबई : संवाद, पत्रव्यवहार आणि वारंवार पाठपुरावा करून सर्व स्तरांवरून होणारी मराठीची अवहेलना लक्षात घेऊन मराठीविषयक साहित्य, सांस्कृतिक संस्थांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. ‘मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठ’च्या वतीने येत्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २४ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येईल. आंदोलनात राज्यभरातील २४ संस्था, १०० लेखकांचा सहभाग असेल.
मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी ‘मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठ’तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करून मराठीच्या पदरी निराशा आली. त्यामुळे धरणे आंदोलनातून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न होईल. या माध्यमातून ठोस उपाययोजना कराव्यात हा उद्देश आहे. साहित्यिक संख्यात्मक शक्तिप्रदर्शन करून सरकारी यंत्रणेवर दबाव आणू शकत नाहीत, मात्र एकत्र येऊन मतप्रदर्शन करू शकतात. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार म्हणाले, मराठीविषयी राज्यकर्त्यांमध्ये टोकाची उदासीनता आहे, हे उघड झाले आहे. त्यामुळे आता मराठीच्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक होण्याची गरज आहे.तर, कार्याध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, प्रलंबित मागण्यांचे निवेदन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना यापूर्वीच दिले आहे. सरकारमध्ये बदल होण्यापूर्वी तातडीने काही गोष्टी मान्य करून घ्यायच्या आहेत. प्रलंबित मागण्यांची कृतिशील अंमलबजावणी, येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यकर्त्यांनी आम्ही तयार केलेला जाहीरनामा स्वीकारावा यादृष्टीने काम करण्यात येईल.अशा आहेत प्रमुख मागण्याच्मराठी शिक्षण कायदाच्मराठी शाळांचे सक्षमीकरणच्शालेय ग्रंथालय समृद्ध करणेच्मुंबईत मराठी भाषा भवन स्थापन करणेच्मराठी अभिजात आहे, हे गृहीत धरून निधीची तरतूद करणेच्मराठी शाळांचा प्रलंबित बृहद्आराखडा लागू करणे