आझमीनगर वीस वर्षे मागासलेलीच; माफियांचा धंदा जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 02:35 AM2019-05-16T02:35:25+5:302019-05-16T02:35:33+5:30

मालवणीतील आझमीनगर, अंबुजवाडी हा परिसर गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून राजकारण्यांसाठी मोठी व्होट बँक म्हणून ओळखला जातो.

 Azamnagar is dead for twenty years; Mafia business loud | आझमीनगर वीस वर्षे मागासलेलीच; माफियांचा धंदा जोरात

आझमीनगर वीस वर्षे मागासलेलीच; माफियांचा धंदा जोरात

Next

- गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई : मालवणीतील आझमीनगर, अंबुजवाडी हा परिसर गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून राजकारण्यांसाठी मोठी व्होट बँक म्हणून ओळखला जातो. मात्र सोयी-सुविधांच्या बाबतीत ही दोन्ही नावे जगाच्या वीस वर्षे मागे गेली आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याचे कारणही तसेच आहे. रस्ते, स्वछता, वीज या समस्या तर या ठिकाणी आहेतच; मात्र त्यांच्यासाठी त्याहूनही भयाण असलेली एक समस्या आहे आणि ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची. या परिसरात असलेल्या वानवांमुळे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला एक गॅलन पिण्याच्या पाण्यासाठी अथक परिश्रम करावे लागत आहेत.
मालवणीचे आझमीनगर, अंबुजवाडी हे परिसर गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांचा सामना करीत आहेत. मात्र ‘लोकमत’ने घेतलेल्या आढाव्यानुसार सर्वांत मोठी समस्या दिसली ती पाण्याचीच होती. सकाळी लहान लहान मुले पाण्याचे रिकामे गॅलन हातात घेऊन पाण्यासाठी रांगा लावतात. त्यांची शाळादेखील अनेकदा पाण्यासाठी बुडाली असल्याचे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. तर मोठी माणसे सायकलवर पाण्याचे रिकामे चार-चार गॅलन घेऊन बाहेर पडतात. मुख्य म्हणजे आजही तिथली परिस्थिती बदललेली नाही. बोरिंगने पाणी देणारे अव्वाच्या सव्वा पैसे आकारत लोकांची लुबाडणूक करतात. महिना तीनशे ते चारशे रुपये लोकांकडून घेऊन स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे पाणी विकले जाते. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी पाच लीटरचा एक गॅलन वीस ते पंचवीस रुपयांना विकला जातो. एका घरात दिवसाला कमीतकमी चार ते पाच गॅलन लागतात. अंबुजवाडी आणि आझमी नगरची लोकसंख्या बारा ते पंधरा हजरांच्या आसपास आहे. त्यानुसार या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या धंदा किती जोरात चालत असेल याचा अंदाज येतो. अख्ख्या मालवणीत मिनी बिसलेरी म्हणून पाण्याची एक पिशवी १ ते २ रुपयांना विकत मिळते. हे पाणी बऱ्याचदा फुटलेल्या जलवाहिन्यांमधून भरलेले असते. कारखान्यात काम करणाºया कामगारांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतो़

आम्ही आमच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी अख्ख्या मालवणीत गेल्या अनेक वर्षांपासून फिरत आहोत. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी लागणाºया गॅलनपासून या लोकांची सुटका अद्याप झालेली नाही. स्थानिक राजकारणी आणि शेकडो स्थानिक पत्रकार तसेच आरटीआय कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. व्होटबँकेपुरता राजकारणीही लोकसंख्येचा त्यांचा वापर करतात. मात्र त्यांना आवश्यक असणारी पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा देण्यात अद्याप राजकारणी, समाजसेवक आणि पत्रकारही अपयशी ठरल्याची खंत वाटते.
- फिरोज शेख, सामाजिक कार्यकर्ते

आम्ही गेल्या काही महिन्यांपासून आझमीनगर तसेच अंबुजवाडी परिसरात जलवाहिन्यांचे काम करीत आहोत. लवकरच त्यामध्ये पिण्याचे पाणी सुरू केले जाईल. त्यामुळे दोन्ही विभागांतील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल.
- ए. कोरे, दुय्यम अभियंता जलविभाग, पी उत्तर विभाग

Web Title:  Azamnagar is dead for twenty years; Mafia business loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी