मुंबई : मुंबई विद्यापीठाने आॅक्टोबर-नोव्हेंबर, २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बी.कॉम सत्र पाचच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर केला. या परीक्षेसाठी ५७,१६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५६,५११ विद्यार्थी परीक्षेस बसले. यातील ३१,९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ५७.११% एवढी आहे.विद्यापीठाने निकाला हा विद्यापीठाच्या निकालासाठीच्या स्वतंत्र संकेतस्थळावरून जाहीर केला. ५६ हजारांपेक्षा जास्त आसन क्रमांक असल्याने, आसन क्रमांकानुसार स्वतंत्र फाइल्स करून, त्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या, जेणेकरून विद्यार्थ्यास संकेतस्थळावर निकाल पाहणे सोपे होईल. परीक्षा मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर, तसेच राज्याबाहेरील सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातील एक परीक्षा केंद्र अशाप्रकारे एकूण २३६ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेसोबतच आतापर्यंत ९६ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले की, बी.कॉम सत्र ५ चा निकाल हा मुंबई विद्यापीठाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, महाविद्यालय प्राचार्यांनी, शिक्षकांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल्यानेच हा व विद्यापीठाचे विविध निकाल जाहीर करणे शक्य होत असल्याचे सांगितले. तर हे निकाल अचूक व निर्दोष लावण्यासाठी विद्यापीठातर्फे विशेष काळजी घेण्यात आली होती, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
बी. कॉमचे ५७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 6:25 AM