बी. कॉम. चा निकाल सलग दोन वर्षे घसरला; कोविडकाळात आलेली सूज ओसरली पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 07:33 AM2023-12-17T07:33:37+5:302023-12-17T07:33:45+5:30
वाणिज्य शाखेची बी.कॉम. अंतिम वर्षाची (तृतीय) परीक्षा ही विद्यापीठाची सर्वात मोठी परीक्षा आहे. साधारणपणे ६० हजार विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड काळात ऑनलाइन परीक्षा, बहुपर्यायी प्रश्न, अंतर्गत मूल्यांकन यांमुळे मुंबई विद्यापीठ परीक्षांच्या निकालांना आलेली सूज आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागताच ओसरू लागली आहे.
मात्र, त्यावेळी पहिल्या-दुसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे झालेले नुकसान कमी होण्याच्या मार्गावर नाही. बी.कॉम.चा निकाल सर्वसाधारण परिस्थितीत ७० ते ७५ टक्क्यांच्या आसपास लागतो. मात्र, यंदा बी.कॉम. सत्र पाचचा निकाल अवघा ३७.७४ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीही तो ३८ टक्क्यांवर घसरलेला होता.
वाणिज्य शाखेची बी.कॉम. अंतिम वर्षाची (तृतीय) परीक्षा ही विद्यापीठाची सर्वात मोठी परीक्षा आहे. साधारणपणे ६० हजार विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात. २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षातील पाचव्या सत्राची परीक्षा ऑक्टोबरमध्ये झाली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
पाचव्या सत्राला असलेले विद्यार्थी हे विद्यार्थी एप्रिल महिन्यात अंतिम सत्राला (सहाव्या) सामोरे जातील. त्यांच्यासाठी निकाल सुधारण्याची ही शेवटची संधी असेल. २०२० आणि २०२१ चे सर्वच परीक्षांचे निकाल ९० टक्क्यांपर्यंत फुगले होते.
नुकसान
परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याने विद्यापीठाने परीक्षा पद्धती पूर्ववत केली आहे. कोविडकाळात पहिल्या व दुसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग न भरल्याने नुकसान झाले. त्याचे परिणाम विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या निकालांवर होत आहेत.