ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ५ : बोरीवली येथील गोखले शिक्षण संस्थेच्या श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएनएस) विभागाच्या वतीने मंगळवारी वृक्षारोपण उपक्रम पार पडला. महाविद्यालयाच्या आवारातच पार पडलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून यावेळी औषधी वनस्पतींचे रोपण करुन विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.नुकताच वनविभागाच्या वतीने जास्तीत जास्त झाडे लावण्याबाबत आवाहन करण्यात आल्यानंतर विविध महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडूनही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्रत्येक महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या नव्या शैक्षणिक वर्षातील उपक्रमाची सुरुवात अनेकवेळा वृक्षारोपण उपक्रमाद्वारेच होते. असाच एक उपक्रम मंगळवारी बी. वर्तक महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी पार पाडला.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. व्ही. संत, उपप्राचार्य डॉ. नितीन आचार्य, उपप्राचार्य डॉ. आर. पी. देशपांडे, एनएसएस प्रोग्राम आॅफिसर प्रवीण गाडगे आणि इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ४० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. यावेळी तुळस, कोरफड, अशोक, अश्वगंधा, नींबू आणि पानफूटी यांसारख्या औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले.
बी. वर्तक महाविद्यालयात औषधी वृक्षारोपण
By admin | Published: July 05, 2016 9:31 PM