मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या अंतिम वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या हिवाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीए सत्र ५ या परीक्षेचा निकाल ४५.२० टक्के इतका लागला आहे.
या परीक्षेमध्ये एकूण ५७८२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला १३ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ८२० एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ५१६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. या परीक्षेत ७००९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षेत २९ कॉपी केसेस झाल्या आहेत.
या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून कोणताही निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या हिवाळी सत्राचे २७ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर जाहीर करण्यात आले आहेत.