बाबा हाच पहिला मित्र; सेलिब्रिटींनी व्यक्त केली भावना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:18 AM2018-06-17T01:18:16+5:302018-06-17T01:18:16+5:30
आज सर्व जगभरात फादर्स डे साजरा केला जातोय. यानिमित्ताने मराठी रंगभूमी आणि सिनेविश्वातील सेलीब्रिटी आपल्या वडिलांसोबत आजचा दिवस कसा साजरा करतात, त्यांच्या आयुष्यात वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहे.
आज सर्व जगभरात फादर्स डे साजरा केला जातोय. यानिमित्ताने मराठी रंगभूमी आणि सिनेविश्वातील सेलीब्रिटी आपल्या वडिलांसोबत आजचा दिवस कसा साजरा करतात, त्यांच्या आयुष्यात वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, ते आजचा दिवस कशा पद्धतीने साजरा करणार आहेत, याविषयी जाणून घेण्याचा आम्ही केलेला हा प्रयत्न...
>संतोष जुवेकर - अनंत जुवेकर
माझा बाबा हा माझा पहिला मित्र आहे. माझ्या बाबांनी माझ्यावर ना कधी हात उचलला, ना कधी ओरडले. उलट मी जेव्हा सिनेमाक्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. तुला जे योग्य वाटतंय, तुला ज्या गोष्टींत आनंद मिळतोेय तेच तू कर, असा नेहमी सल्ला त्यांनी मला दिला. आज मी बाबाला त्याच्या आवडीच्या हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे. आज त्यांच्यासोबत वेळ घालवणार आहे. मला त्यांना फक्त ‘फादर्स डे’च्या दिवशी नाही, तर पुढचे सगळे दिवस आनंदी पाहायचे आहे.
>डॉ. रवींद्र घांगुर्डे - सावनी रवींद्र : माझे बाबा हे एक प्रतिष्ठित शास्त्रीय गायक आणि संगीत रंगभूमीवरचे गायक अभिनेते आहेत. माझी जी गायनक्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे, त्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या वडिलांना देते. लहानपणापासून मी त्यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. लहानपणापासून माझ्या प्रत्येक कार्यक्रमावेळी माझ्याकडून योग्य तो रियाज करून घेतात. तसेच माझा कार्यक्रम कसा झाला, याची उत्सुकता त्यांनाच जास्त असते. नुकतेच माझे लग्न झाले आणि मी माझ्या सासरी आले. जंगी असे सेलिब्रेशन नाही, पण आज मी माझ्या बाबांच्या घरी चिंचवडला जाऊन त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा आणि वेळ घालविणार आहे.
>कुंडलीक आवटे - नम्रता आवटे - संभेराव
आम्ही तीन भावंडे, पण पप्पांचा सर्वात जास्त विश्वास आणि प्रेम लहानपणापासून माझ्यावर होते. मी त्यांची लाडकी आहे, त्यामुळे माझे लहानपणापासून खूप लाड त्यांनी केले आहेत. त्यांना आमच्या सगळ्यांचे वाढदिवस बरोबर लक्षात असतात. लहानपणी आमच्या वाढदिवसाला पप्पा मस्त चॉकलेट्स घेऊन यायचे. आजही माझ्या वाढदिवसाला पप्पा न चुकता चॉकलेट्स घेऊन येतात. मी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आधी त्यांचा मला सपोर्ट नव्हता, पण एकदा ते माझी एकांकिका पाहायला आले होते. त्यांनी एकांकिकेमधले माझे काम पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात आले. ते खूप भावुक झाले होते. त्यानंतर, त्यांचा विरोेध मावळला, त्यांनी मला नंतर कधीही विरोध केला नाही. पप्पांचा विषय निघाला की, मी खूप इमोशनल होते. ते मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला आहेत. अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आम्हाला वाढविले आहे. पप्पांना आम्ही लाडाने ‘पप्पुड्या’ म्हणतो. पप्पुड्या हॅप्पी फादर्स डे!
>शरद पोंक्षे - सिद्धी पोंक्षे
बाबा माझ्यावर कधीच ओरडत नाहीत. मला बाबांचा खूप अभिमान वाटतो. बाहेर त्यांचे इतके नाव असूनही घरी एकदम सर्वसामान्य माणसासारखे ते राहतात. माझ्या अभ्यासाविषयी, माझ्या करिअरविषयी ते नेहमीच काळजी करत असतात. मला नुकतेच दहावीत ९४ टक्के मिळाले. त्या दिवशी बाबांना जे मी आनंदी पाहिले, ते मी या आधी कधीच पाहिले नव्हते. माझ्यापेक्षा त्यांना जास्त आनंद झाला होता. मला पायलट व्हायचे आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनतही करतेय. मी पायलट होणार यात शंका नाही. कारण माझ्यापाठीमागे अगदी खंबीरपणे माझा बाबा आहे. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. एकाच वेळी ते अभिनयासोबत, समाजसेवाही करत असतात. बाबा यू आर ग्रेट... हॅप्पी फादर्स डे.
>राजन बागवे - ऋतुजा बागवे
माझे बाबा माझ्यासाठी नेहमीच खास असतात. मला त्यासाठी वेगळा फादर्स डे सेलिब्रेट करण्याची गरज नाही. कारण माझे आणि माझ्या वडिलांचे नाते हे अगदी घट्ट आहे. आज मी बाबांसाठी त्यांच्या आवडीचे जेवण करणार आहे. त्यांच्यासाठी मी हँडमेड गिफ्टही आधीच तयार करून ठेवले आहे. त्यांना ते देऊन मी आज सरप्राइज देणार आहे.
- शब्दांकन - अजय परचुरे