Baba Siddique ( Marathi News ) : काल शनिवारी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली. बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
"बाबा सिद्दिकी काँग्रेस पक्षाचे दिर्घकाळ नेते राहिले, त्यांना सुरक्षा होती. त्यांच्या सभोवती अनेक लोक होती, त्या गर्दीत मारेकरांनी त्यांच्यावर हल्ला केला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हत्यांचे सत्र सुरू आहे. त्या आता राजकीय नेत्यांपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. आता या राज्यात कोण सुरक्षित आहे? आमदार , मंत्री सुरक्षित नाहीत. मग गृहखाते काय करत आहे? हरयाणा निवडणुकीचे पेढे वाटत आहे, तुम्ही पेढे खा तुम्ही पण राज्याच्या जनतेसमोर दहशत सुरू आहे अशावेळेला गृहखात्याची काही जबाबदारी आहे की नाही? या राज्याच्या इतिहासात सर्वात निष्क्रिय गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा मागत होतो आता त्यांची हकालपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्देवाने आली आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
"देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि आता काय झाले. त्यांचे अधपतन आमच्या डोळ्यासमोर झालेले आम्ही पाहिले. माझं त्यांना आवाहन आहे त्यांनी विरोधकांच्या काड्या करण्यापेक्षा कर्तव्यभावनेने काम करा. कालची घटना भयंकर आहे, आमच्या सारख्यांची त्यांनी सुरक्षा काढून घेतली. बाबा सिद्दिकी यांना सुरक्षा असताना हत्या झाली. ही हत्या भर वस्तीत हत्या झाली. फडणवीस यांनी फक्त खुलासे करत बसू नये त्यांनी आता राजीनामा द्यावा,अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
मुंबईत जिथे आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे तिथे शिंदेंच्या बॅगा उचलणारे अधिकारी आणले आहेत. अधिकाऱ्यांचे टेंडर निघाले आहेत. आता पोलिसांच्या नेमणूकांध्ये भ्रष्टाचार केला जात आहे, असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. मुंबईत जिथे आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे तिथे शिंदेंच्या बॅगा उचलणारे अधिकारी आणले आहेत. अधिकाऱ्यांचे टेंडर निघाले आहेत. आता पोलिसांच्या नेमणुकांमध्ये भ्रष्टाचार केला जात आहे, असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
मुंबई पोलिसांच्या नियुक्तीसाठी टेंडर निघाले आहेत. हे टेंडर वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर भरले जातात. या परिस्थितीत जनतेने कायदा, सुव्यवस्था आणि आपल्या जीविताचा रक्षण, याबाबत शाश्वती बाळगणे म्हणजे फार गंभीर गोष्ट आहे असंही राऊत म्हणाले.