झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 08:05 PM2024-10-16T20:05:22+5:302024-10-16T20:06:37+5:30
बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली.
Baba Siddique Murder Case ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राज्याच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या नेत्याच्या हत्येनं सगळीकडे खळबळ उडाली असून यामागे नक्की कोणाचा हात आहे, याबाबत पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. अशातच आज बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेत हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत चर्चा केली आहे.
झिशान सिद्दिकी यांनी आज सहपोलीस आयुक्तांच्या भेटीत हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत काही मुद्दे गुन्हे शाखेला सांगितले. अधिकाऱ्यांकडूनही झिशान यांना आतापर्यंतच्या तपासाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागून मास्टरमाइंडचा शोध घेण्यात पोलिसांना यश येते का, हे पाहावं लागेल.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट कसा रचला गेला?
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील शूटर्सनी गेल्या महिन्यात वांद्रे आणि आसपासच्या भागात सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी १० हून अधिक वेळा प्रयत्न केले होते. पण ते त्यामध्ये अयशस्वी ठरले. पोलिसांनी सांगितलं की, बाबा सिद्दिकी यांची मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली. ही खुली जागा असल्याने शूटर्स हत्या करण्यात यशस्वी झाले.
दाटीवाटीचा परिसर असल्याने याआधी बाबा सिद्दिकी यांची हत्या करताना शूटर्स अयशस्वी झाले होते. विविध कारणांमुळे शूटर्सना गोळीबार करण्याची संधी मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनेकवेळा बाबा सिद्दिकी आले नाहीत आणि जेव्हा ते आले तेव्हा अनेक समर्थक त्यांच्यासोबत असायचे त्यामुळे आरोपींना त्यांचा प्लॅन बदलावा लागायचा.
पोलिसांनी हत्या प्रकरणातील आरोपी हरीश कुमार निषाद (२४) याला उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथून अटक केली. त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी शूटर्सची नावं आहेत. प्रवीण लोणकर यालाही अटक केली आहे. तो शुभम लोणकरचा भाऊ आहे. आरोपीने खरेदी केलेली बाईक पोलिसांनी जप्त केली आहे, शूटर्सना रेकीसाठी ती बाईक देण्यात आली होती. आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, प्रवीणने निषादला सेकंड हँड बाईक घेण्यासाठी ६० हजार रुपये दिले होते. या बाईकवरून निषाद पुण्याहून मुंबईला गेला आणि कुर्ल्यातील भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या शूटर्सना ही बाईक दिली. बाबा सिद्दिकी यांची रेकी करण्यासाठी शूटर्सनी बाईकचा वापर केला.