Zeeshan Siddique (Marathi News) मुंबई : काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. झिशान सिद्दिकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांनी या महिन्यात काँग्रेसची साथ सोडली आणि राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला. दरम्यान, झिशान सिद्दिकी यांच्या जागी अखिलेश यादव यांना मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
झिशान सिद्दिकी हे वांद्रे (पूर्व) चे आमदार आहेत. वडिलांनी पक्षांतर करण्यापूर्वी त्यांनी अजित पवार आणि इतर नेत्यांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बाबा सिद्दिकी यांचे पक्षात स्वागत केले होते. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर झिशान सिद्दिकी यांना मुंबई युवक अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. यामुळे आता झिशान सिद्दिकी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई काँग्रेसचे प्रमुख मुस्लिम चेहरा असलेले बाबा सिद्दिकी यांनी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना मंत्री म्हणून काम केले होते. बाबा सिद्दिकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा आमदार होते. त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. यापूर्वी दोन वेळा सलग टर्म (1992-1997) नगरसेवक म्हणूनही काम केले होते. तसेच, त्यांचा बॉलीवूडमध्ये चांगला संपर्क आहे. शाहरुख, सलमान खानपासून अनेक बॉलीवूड कलाकरांचा त्यांच्याशी संबंध आहे.