स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे म्हणजे असे...
By अतुल कुलकर्णी | Published: February 19, 2024 12:14 PM2024-02-19T12:14:31+5:302024-02-19T12:15:29+5:30
बाबा सिद्दिकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी देखील राष्ट्रवादीमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली.
अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई
बाबा सिद्दिकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी देखील राष्ट्रवादीमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली. मुंबई काँग्रेसमधून आणखी कोण, कुठे जाणार, याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अमीन पटेल, नसीम खान, अस्लम शेख आणि स्वतः झिशान सिद्दिकी यांना भाजप घेईल की नाही यापेक्षा ते भाजपमधून निवडून येतील की नाही, अशी शंका या नेत्यांच्या स्वतःच्या मनात आहे. या सगळ्यांच्या मतदारसंघात मुस्लीमबहुल मतदार आहेत. हे नेते भाजपमध्ये गेले, तर त्यांना तो मतदार मतदान करणार नाही. बाबा सिद्दिकी जरी राष्ट्रवादीत गेले, तरी त्यांचा मुलगा अजूनही काँग्रेसमध्ये आहे. आपण राष्ट्रवादीत गेलो, तर वांद्रे पूर्व मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आपल्याला मतदान करणार नाहीत आणि महायुती असली, तरी भाजपचे मतदान आपल्याला होईलच, याची कसलीही खात्री झिशान सिद्दिकी यांना नाही, हीच अवस्था मुंबई काँग्रेसमधून कोणत्या पक्षात जायचे याचा विचार करणाऱ्या नेत्यांची झाली आहे.
भाजपचा पारंपरिक मतदार आपल्याला मतदान करणार नाही याची शंभर टक्के खात्री या नेत्यांना आहे. राष्ट्रवादीत जावे तर स्वतःच्या समाजाची मते मिळण्याची खात्री उरलेली नाही. कारण भाजपशी टक्कर घेणारा एकमेव नेता उद्धव ठाकरे आहे, असे मुस्लीम समाजातील काही नेत्यांना आता वाटत आहे. त्यामुळे या नेत्यांची भाजप किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चाचपणी दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यास उद्धव ठाकरेंमुळे जी मते आपल्याला मिळाली असती तीही मिळणार नाहीत, अशी भीती या नेत्यांपुढे आहेच. भाजपला लोकसभेसाठी सगळे इनकमिंग पूर्ण करायचे आहे आणि मुंबई काँग्रेसमधून अन्य पक्षात जाऊ पाहणाऱ्या नेत्यांना विधानसभेचे लक्ष्य गाठायचे आहे. एकाच स्टेशनवर दोन गाड्या वेगळ्या दिशेने जाणाऱ्या आल्या की इच्छित स्थळी कुठल्या मानि लवकर जाऊ याचा नुसताच विचार करत बसले की, दोन्ही गाड्या निघून जातात... अशी अवस्था सध्या मुंबई काँग्रेसमधील नेत्यांची झाली आहे.
धारावीत काँग्रेसचे नेतृत्व आहे. वर्षा गायकवाड धारावीच्या पॉवरफुल नेत्या आहेत. धारावी पुनर्वसनाचा विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. धारावीकरांच्या बाजूने आंदोलन मात्र उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यासाठी रॅली काढली. त्या व्यासपीठावर वर्षा गायकवाड जाऊन बसल्या.
नसीम खान धारावीचे प्रश्न वर्षा गायकवाड यांना जास्त माहिती आहेत की उद्धव ठाकरे यांना? असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती. आपण ज्या भागातून वर्षानुवर्षे निवडून येतो, त्या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दुसऱ्या पक्षाचा नेता येऊन आंदोलन करतो आणि आपण त्या आंदोलनात सहभागी होतो, याची खंत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला वाटलेली दिसत नाही. मुंबई काँग्रेसने धारावीच्याच नव्हे, तर केवळ मुंबईच्या प्रश्नांवर राज्यपाल, लोकपाल किंवा साधे महापालिका आयुक्तांना भेटून किती प्रश्न धसास लावले, हे सांगितले पाहिजे, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, तेव्हा भाजपने जलसिंचनाच्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावरून राज्यभर रान उठवले. आपल्याकडे गाडीभर पुरावे आहेत, असे सांगितले. गेल्या कित्येक महिन्यांत जी जी आंदोलने भाजपने उभी केली, त्यात जाणीवपूर्वक परसेप्शन तयार करण्याचे काम भाजपने केले. त्याच्या पाट टक्के कामही मुंबई काँग्रेसला करता येत नाही.
मुंबईत राहणाऱ्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन उभे करून एक तरी मागणी मुंबई काँग्रेसने पदरात पाडून घेतली का? मुंबईत एखादी घटना घडली की, त्याचे पडसाद देशभर उमटतात. ती नॅशनल न्यूज बनते, एवढे न कळण्याइतके मुंबई काँग्रेसमध्ये कोणीही दुधखुळे नाही. मात्र, कोणालाही काहीच करायचे नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाला आपण कसे निवडून येऊ, याच्यापलीकडे दुसरा काडीचाही विचार उरलेला नाही.
धारावीत राहणाऱ्यांचे पुनर्वसन मुलुंड परिसरात करायचे अशी चर्चा सुरू झाली आणि त्या भागातील लोकांनी या निर्णयाला विरोध करणारे आंदोलन सुरू केले. यातील सगळ्यात गमतीचा भाग असा की, धारावीतील काहींचे पुनर्वसन मुलुंड परिसरात करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. मुलुंडचे
आमदार भाजपचे... खासदार भाजपचे... तिथले सहा नगरसेवकही भाजपचेच होते..! एवढेच नाही तर गृहनिर्माण मंत्रीही भाजपचे..! आणि मुलुंड भागात पुनर्वसन करू नका, म्हणून आंदोलन करणारे नेतेही भाजपचेच..। किरीट सोमय्या, मिहीर कोटेचा यांनी हे करण्याला विरोध दर्शवणारी निवेदने दिली. पत्रकार परिषदा घेतल्या आणि आंदोलनही सुरू केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही आंदोलन सुरू केले. मुंबई काँग्रेसच्या कानावर अजून हा विषय गेलेला नाही, इतकी तर मुंबई काँग्रेस सध्या जागरूक आणि सजग आहे.
मुंबई महापालिकेने ज्या गतीने मोठमोठे भाजपने प्रकल्प हाती घेतले आहे, ते पाहता १० ते १५ वर्षांत पालिकेला या प्रकल्पांपोटी करावा लागणारा खर्च व एस्टॅब्लिशमेंट कॉस्टपोटी दोन लाख कोटींची व्यवस्था करावी लागेल. दहा वर्षे सत्तेत राहिलेल्या केंद्र सरकारने त्याआधीच्या काँग्रेसच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढली. मात्र मुंबई काँग्रेसला मुंबई पालिकेच्या कारभाराची काळी पत्रिका काढून जनतेपुढे द्यावी, असे वाटत नाही, काँग्रेसच्याच केंद्रातील नेत्यांनी केलेल्या कृतीची कॉपी देखील मुंबई काँग्रेसला नीटपणे करता येत नाही. एखाद्या संकटाचे संथीत रूपांतर करण्यासाठी कान, नाक, डोळे उघडे ठेवावे लागतात. ज्या दिवशी मुंबई काँग्रेसचे कान, नाक, डोळे उघडतील तो मुंबई काँग्रेससाठी सुदिन म्हणावा लागेल.