Join us

मारेकऱ्यांनी वापरली खासगी वाहने; उदयपूरहून आले मुंबईत; गुन्हे शाखेच्या तपासांतून निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 8:42 AM

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चार आरोपींच्या पोलिस कोठडीत सत्र न्यायालयाने सोमवारी २५ ऑक्टोबर पर्यंत वाढ केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी मुंबईत येण्यासाठी सार्वजनिक बस आणि खासगी वाहनांचा वापर केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासातून उघड होत आहे.

जुलै महिन्यात राम फुलचंद कनोजिया आणि नवी मुंबईतील भंगारवाला भगवतसिंग ओमसिंग हे एकत्रच राजस्थानला गेले होते. ते उदयपूरला एका हॉटेलमध्ये राहिले. अज्ञात ठिकाणी अनोळखी व्यक्तीमार्फत त्यांना तीन पिस्तुले देण्यात आली. ती देणाऱ्याचे फक्त वर्णन त्यांना सांगण्यात आले होते. त्याच्याकडून पिस्तुले घेतल्यानंतर आपण पकडले जाऊ नये याची दक्षता घेत कनोजिया आणि ओमसिंग कधी बस, तर कधी खासगी वाहनाने प्रवास करीत मुंबईत आले.

त्याच पिस्तुलांतून गोळीबार

- मारेकऱ्यांना उदयपूर येथे देण्यात आलेल्या पिस्तुलातूनच बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला.- पोलिसांनी ती तिन्ही शस्त्रे जप्त केली आहेत. आरोपींनी सोशल मीडिया प्रोफाईल, बॅनर्स आणि रेकी करून सिद्दिकींची माहिती मिळवल्याचे निष्पन्न होत आहे.

चार आरोपींच्या कोठडीत वाढ

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चार आरोपींच्या पोलिस कोठडीत सत्र न्यायालयाने सोमवारी २५ ऑक्टोबर पर्यंत वाढ केली. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला रात्री निर्मल नगर भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी हरयाणाचा गुरूमेल बलजीत सिंग, उत्तर प्रदेशचाधर्मराज कश्यप, हरीश कुमार रिसाद आणि पुण्याचा प्रवीण लोणकर यांना अटक केली आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत आरोपी चौकशीत सहकार्य करत नसल्याचे आणि चुकीची माहिती देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

"सॉरी, माझी चूक झाली"

वाहतूक पोलिसांना संदेश पाठवून अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्याने माफी मागितली आहे.  संदेश चुकून पाठवला गेला, असे म्हटले आहे. गेल्या आठवड्यात अभिनेता सलमान खानला धमकी देण्यातआलीहोती. तो संदेश व्हॉट्सॲपद्वारे मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पाठवण्यात आला होता. काही दिवसांनंतर, मुंबई वाहतूक पोलिसांना त्याच क्रमांकावरून आणखी एक संदेश आला, ज्यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने माफी मागितली आहे, असा दावा केला आहे. संदेश पाठवणारा झारखंडचा असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :बाबा सिद्दिकीमुंबई